भूसंपादन ते ठेकेदाराची मनमानी; बीड जिल्ह्यात रखडलेले राष्ट्रीय महामार्ग बनलेत जीवघेणे !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 05:19 PM2022-06-20T17:19:18+5:302022-06-20T17:20:07+5:30

पैठण-पंढरपूर पालखी मार्गाचा गेल्या कित्येक वर्षांपासून गाजावाजा सुरू आहे. परंतु हा मार्ग अजून पूर्णत्वाला जात नाही.

Land acquisition to contractor arbitrariness; Deadly National Highways in Beed District | भूसंपादन ते ठेकेदाराची मनमानी; बीड जिल्ह्यात रखडलेले राष्ट्रीय महामार्ग बनलेत जीवघेणे !

भूसंपादन ते ठेकेदाराची मनमानी; बीड जिल्ह्यात रखडलेले राष्ट्रीय महामार्ग बनलेत जीवघेणे !

googlenewsNext

बीड : जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्वच महामार्गांची कामे गेल्या तीन वर्षांपासून रखडली आहेत. राज्य मार्गांची तर कामेच बंद पडली आहेत. निधी मिळूनही ठेकेदारांच्या मनमानीमुळे काम संथगतीने सुरू आहेत. तर काही ठिकाणी भूसंपादनाचा प्रश्न अजून मिटला नाही. असे असले तरी हे मार्ग वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत असून आतापर्यंत अनेक जणांचे बळी देखील गेले आहेत. तरी याकडे शासकीय यंत्रणा, नेते मंडळींचे दुर्लक्ष होत आहे.

पाटोदा ते अहमदपूर हा राष्ट्रीय महामार्ग सध्या मृत्यूमार्ग बनला आहे. काम पूर्ण करण्याचा कालावधी संपूनही अद्याप नेकनूर, केज, अंबाजोगाई शहरातील कामे अपूर्णच आहेत. या मार्गावर जवळपास ३८ पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला आहे. वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. दरम्यान, औरंगाबाद-बीड-सोलापूर व कल्याण-गेवराई-माजलगाव-नांदेड महामार्गाचे काम बऱ्यापैकी झाले असले तरी याही रस्त्यावर अनेक ठिकाणी कामे अपुरे आहेत.

तांत्रिक अडचण, टेंडर निघताच काम सुरू
आष्टी तालुक्यातून सध्या बीड-कडा-नगर राष्ट्रीय महामार्ग तर बीड-धामणगांव-नगर राज्य महामार्ग व पैठण-बारामती असे तीन महामार्ग गेले असून तिन्ही रस्त्याचे काम तालुक्यात बंद आहे. सध्या हे महामार्ग अपघात मार्ग बनत आहेत. दोन महिन्यापूर्वी धामणगावनजीक चार जणांचे बळी गेले आहेत. या महामार्गाचे टेंडर निघताच कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता आर. व्ही. भोपळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

बीड जिल्ह्यातून गेलेले राष्ट्रीय महामार्ग
महामार्ग क्रमांक-२११ (नवीन ५२)- औरंगाबाद-सोलापूर.
२२२-कल्याण-अहमदनगर-गेवराई-माजलगाव-नांदेड-निर्मल
५४८-बी-पिंपळा-परळी-मांजरसुंबा., लोखंडी सावरगाव-रेणापूर.
५४८-सी-परतूर-केज, केज-कुसळंब.
५४८-डी-अहमदपूर-पाटोदा, अहमदपूर-अहमदनगर.
७५२-ई-पैठण-पंढरपूर (पालखी महामार्ग)
३६१-एफ-खरवंडी-नवगण राजूर-बीड.

पालखी मार्गाचे स्वप्न अधुरे
पैठण-पंढरपूर पालखी मार्गाचा गेल्या कित्येक वर्षांपासून गाजावाजा सुरू आहे. परंतु हा मार्ग अजून पूर्णत्वाला जात नाही. अनेक ठिकाणी भूसंपादन झाले नाही. तसेच रस्ते, पूल अपूर्ण आहेत. यामुळे यंदाही हा मार्ग आषाढीसाठी वारकऱ्यांना वेदनादायी ठरणार असल्याचे चित्र आहे.

Web Title: Land acquisition to contractor arbitrariness; Deadly National Highways in Beed District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.