मोबाईलच्या जमान्यात लॅण्डलाईन घटले, क्वाईनबॉक्सची ‘ट्रिंग ट्रिंग’ कालबाह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:39 AM2021-09-08T04:39:55+5:302021-09-08T04:39:55+5:30
बीड : मागील दोन दशकात तंत्रज्ञानातील बदलामुळे संपर्क सेवा दिवसेंदिवस गतिमान झाली असून टुजीपासून थ्रीजी, फोरजी आणि आता फाईव्हजीकडे ...
बीड : मागील दोन दशकात तंत्रज्ञानातील बदलामुळे संपर्क सेवा दिवसेंदिवस गतिमान झाली असून टुजीपासून थ्रीजी, फोरजी आणि आता फाईव्हजीकडे देशाची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे आता घरातील प्रत्येक सदस्याकडे मोबाईल आला आहे. परिणामी संपर्कासाठी घराघरात अधिराज्य गाजवणाऱ्या लॅन्डलाईन फोनची संख्या कमालीची घटली असून हॉटेल, पान दुकाने, किराणा, औषधी दुकाने, सार्वजनिक ठिकाणी दिसणारे क्वाईन बॉक्स तर हद्दपार झाले आहेत. दुसरीकडे अनेक जण आजही कॉलिंग आणि ब्राडबँडसाठी लॅन्डलाईनचा वापर करीत आहेत. तसेच इंटरनेट आणि कॉलिंग सुविधेमुळे फायबर टू द होमचा (बीएसएनएल फायबर) वर्क फ्रॉम होम व ऑनलाईन क्लासेससाठी वापर वाढला आहे. या ग्राहकांची संख्या ४२०१ इतकी आहे. तर केबल आणि ऑप्टिकल फायबर अशी सुविधा असलेल्या लिजलाईनचा बँक, सरकारी कार्यालय, दवाखाने, उद्योग, मोठे कारखाने आदी ठिकाणी सध्या ५०० कनेक्शन आहेत.
क्वाईन बॉक्स कुठेच नाही
एसटीडी, पीसीओ व क्वाईन बॉक्सच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळत होता. त्याचबरोबर मोबाईल सेवा नव्हती, नंतर आली तर महाग होती. त्यामुळे अडलेले अनेकजण एसटीडी, पीसीओ व क्वाईन बॉक्सचा संपर्कासाठी वापर करत होते. मात्र आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्याने क्वाईन बॉक्सची गरज कोणालाही राहिलेली नाही.
लँडलाईनची संख्या ९० टक्के घटली
बीड जिल्ह्यात २००६-०७ मध्ये लँडलाईन फोन कनेक्शनची संख्या ४० हजारांहून अधिक होती. आज घडीला केवळ ४,८०३ कनेक्शन आहेत. कॉल आणि ब्रॉडबँडसाठी त्याचा ग्राहक वापर करतात.
घरातल्या प्रत्येक सदस्याच्या हातात मोबाईल आहे. मोबाईलच्या माध्यमातून एसटीडी, आयएसडी आणि व्हिडिओ कॉलची सुविधा मिळते. स्वस्त आणि कोठेही मोबाईल वापरता येत असल्याने उगाच भाडे भरून लँडलाईनची सेवा कशाला चालू ठेवायची या कारणामुळे अनेकांनी आपले लँडलाईन कनेक्शन बंद केले आहेत.
५०० ठिकाणी लीजलाईन
मोबाईलधारक पावणेदोन लाखाच्या घरात
सध्या बीएसएनएलच्या प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांची संख्या एक लाख ८० हजाराच्या घरात आहे.
ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली आणि समाधानकारक सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून बीएसएनएलच्या एफटीटीएच कनेक्शनसाठी मागणी वाढत आहे. लँडलाईन फोनची संख्या कमी झाली असली तरी एफटीटीएचकडे हे ग्राहक वळत आहेत अशी माहिती दूरसंचारचे जिल्हा प्रबंधक विजय चौधरी यांनी दिली.
----
माझ्याकडे २०-२२ वर्षांपासून लँडलाईन फोन वापरात आहे. ग्राहक आणि व्यापाऱ्यांशी थेट संपर्क करता येतो. त्यांनाही सुलभ होते. मोबाईल नेटवर्कच्या अनेकदा अडचणी असतात. शिवाय ज्याला फोन लावायचा त्या व्यक्तीचे ॲड्रेस प्रूफ होते. आमच्यासाठी लँडलाइनही आवश्यकच आहे. - जनार्दन दहिवाळ, व्यावसायिक, बीड.
------------
आमच्याकडे अनेक वर्षांपासून लँडलाईन फोन आहे. मोबाईलही वापरतो. ज्यांना तक्रार अथवा संपर्क करायचा, यासाठी लँडलाईन फोन कनेक्शन आहे. मात्र ५०-५० तक्रारी करूनही बीएसएनएलकडून समाधान झालेले नाही. लँडलाईनचे भाडे भरतो, पण फोन डेड असतो. - कैलास कासट, व्यावसायिक, बीड.