माजलगाव धरणात पाण्याची मोठी आवक, सिंदफणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 06:39 PM2021-09-05T18:39:13+5:302021-09-05T18:39:20+5:30
Beed News: सध्या परिसरात पाऊस सुरू असल्याने धरण केव्हाही भरण्याची शक्यता आहे.
माजलगाव (पुरूषोत्तम करवा)- माजलगाव धरणाच्या वरील भागात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून पहाटेपासून मोठी आवक सुरू आहे झाली. आता हे धरण केव्हाही भरू शकते, त्यामुळे प्रशासनाने सिंदफणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी माजलगाव धरण 18 टक्के पाणीसाठा उपलब्धता होता. मान्सूनपूर्व पावसामुळे धरणात 2-3 टक्के पाणीसाठा वाढला होता. 31 ऑगस्ट रोजी धरण परिसरात चांगला पाऊस झाल्यानंतर पाणी पातळी 35 टक्यापर्यंत गेली. त्यानंतर शनिवारी रात्री व रविवारी पहाटे शिरूर, आष्टी ,पाटोदा आदी भागात जोरदार पाऊस झाल्याने सिंदफणा नदीतून धरणात रविवारी सकाळी पाण्याची 82 हजार क्युसेसने ऐवढी मोठी आवक सुरू झाली होती.
शनिवारी रात्री धरणात 60 टक्के पाणी उपलब्ध होते, त्यात रात्रीतून वाढ होऊन दुपारी दोन वाजेपर्यंत धरणात 82 टक्के पाणी झाले. हे धरण भरण्यासाठी 431.80 मीटर ऐवढी पाणी पातळी आवश्यक आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पाहता धरण येत्या सहा तासात भरण्याची शक्यता निर्माण झाली असल्याची माहिती धरणाचे अभियंता बी आर शेख यांनी दिली. दरम्यान, सिंदफणा नदीकाठच्या गावांना लेखी व दौंडी द्वारे सतर्कतेचा इशारा दिला आहे.