'शेवटचा नमस्कार', स्टेट्सवर 'देवाण-घेवाण' यादी शेअर करून तरुणाने संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 02:24 PM2023-04-04T14:24:07+5:302023-04-04T14:24:32+5:30
आर्थिक व्यवहारातील देवाण घेवाणीची यादीच तरुणाने सोशल मिडीयावर शेअर केली
गेवराई : 'शेवटचा नमस्कार, ४२ वर्षांच्या माझ्या आयुष्यात कुटुंबाला कधीच आनंदी ठेवू शकलो नाही. मी जीवनात काहीच करू शकलो नाही'; अशी पोस्ट फेसबुकवर शेअर करून एका तरुणाने छत्रपती संभाजीनगरच्या जवळ एका शेतात आज पहाटे गळफास घेऊन जीवन संपवलं. चेतन ऊर्फ गुड्डु जैस्वाल ( ४२) असे मृताचे नाव असून तो शहरातील चिंतेश्वर गल्ली येथील रहिवासी होta. मागील काही वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर येथे स्थायी झाले असल्याची माहिती आहे.
चेतन ऊर्फ गुड्डु जैस्वाल हे गेवराईतील उद्योजक रवि जैस्वाल यांचा एकुलता एक मुलगा होता. मागील ८ वर्षांपासून चेतन छत्रपती संभाजी नगर येथे राहत. चेतन याने सोमवारी रात्री आपल्या फेसबुकवर ''शेवटचा नमस्कार, मी चेतन ऊर्फ गुड्डु जैस्वाल माझ्या ४२ वर्षाच्या जीवनात मी माझ्या फॅमिलीला कधीच आनंदी ठेवू शकलो नाही व जीवनात काहीच करू शकलो नाही.'' अशी पोस्ट लिहिली. तसेच खाली 'माझा आर्थिक व्यवहार' असे लिहित कोणाकडे किती पैसे येणार, कोणाला किती पैसे देयचे अशी 'येणे-देणे' यादीच लिहिली आहे. त्यानंतर आज पहाटे छत्रपती संभाजीनगरच्या पुढे एका शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पुढिल तपास छत्रपती संभाजी नगर येथील पोलीस करत आहेत. त्याच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.