जाँबाज श्वान ‘जॉनी’ला अखेरचा सलाम...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 11:58 PM2019-11-10T23:58:51+5:302019-11-11T00:00:12+5:30
जिल्हा पोलीस दलातील बॉम्ब शोधक व नाशक पथकातील अनेक गुन्ह्यांचा छडा लावणाऱ्या व स्फोट शोधक श्वान ‘जॉनी’ याचे आजारपणामुळे रविवारी सकाळी ६.१५ वाजता निधन झाले. त्याच्या पार्थिवावर दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
बीड : जिल्हा पोलीस दलातील बॉम्ब शोधक व नाशक पथकातील अनेक गुन्ह्यांचा छडा लावणाऱ्या व स्फोट शोधक श्वान ‘जॉनी’ याचे आजारपणामुळे रविवारी सकाळी ६.१५ वाजता निधन झाले. त्याच्या पार्थिवावर दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
‘जॉनी’ या श्वानाचा जन्म २६ आॅक्टोबर २०११ रोजी झाला होता. त्यानंतर अवघ्या १ महिन्याचा असताना बीड पोलीस दलात सहभागी झाला होता. पुणे येथील गुन्हा अन्वेषण विभागाच्या प्रशिक्षण केंद्रात त्याने सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ‘जॉनी’ बीड पोलीस दलाच्या बॉम्ब शोधक पथकात कार्यरत झाला होता. विविध गुन्ह्यांचा शोध घेण्यात त्याचे मोठे योगदान होते. त्यामुळे विविध पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आले होते. २०१३ मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या पोलीस कर्तव्य मेळाव्यात जॉनीने प्रथम पारितोषिक पटकावले. तर, २०१४ मध्ये हरियाणात झालेल्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यातही त्याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. २०१५ साली पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र कर्तव्य मेळाव्यात जॉनीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पारितषिक मिळाले होते.
दरम्यान, रविवारी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयातून त्याची अंत्ययात्रा निघाली. पार्थिव जीपमध्ये ठेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोरी ओढली व सन्मानपूर्वक अखेरचा निरोप दिला. त्यानंतर पोलीस मुख्यालय मैदानावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून जॉनला मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपाधीक्षक भास्कार सावंत, स्वप्नील राठोड यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
अल्पशा आजाराने झाले निधन
पंढरपूर येथे होणाºया आषाढी आणि कार्तिकीवारीच्या दरम्यान मोठी गर्दी त्याठिकाणी असते. तसेच नागपूर येथे होणाºया विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन, तुळजापूर येथील यात्रेदरम्यान व इतर गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब शोधणे आदी बंदोबस्तात देखील ‘जॉनी’ने सहभाग नोंदवला होता. मागील काही दिवसांपासून तो आजारी होता. या अल्पशा आजारात जॉनीने रविवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला.