कृषी विभागाच्या योजनेसाठी उरले शेवटचे सात दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:37 AM2021-09-21T04:37:49+5:302021-09-21T04:37:49+5:30
बीड : प्रधानमंत्री कृषी सुक्ष्म सिंचन योजने अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर बीड जिल्ह्यातील १६ सप्टेंबरअखेर १७ हजार ३९५ लाभार्थ्यांची लॉटरीद्वारे ...
बीड : प्रधानमंत्री कृषी सुक्ष्म सिंचन योजने अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर बीड जिल्ह्यातील १६ सप्टेंबरअखेर १७ हजार ३९५ लाभार्थ्यांची लॉटरीद्वारे निवड झालेली आहे. ज्या लाभार्थ्यांची लॉटरीद्वारे निवड झालेली आहे व पूर्वसंमती मिळालेली आहे अशा सर्व लाभार्थ्यांनी तत्काळ महाडीबीटी पोर्टलवर आपल्या लॉगीनमधून आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे. त्यासाठी शेवटचे सात दिवस शिल्लक आहेत.
निवड झालेल्यांपैकी १२ हजार ५१० लाभार्थी हे पात्र असून, ७ हजार ६१५ लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड केलेले आहेत व उर्वरित ४ हजार ४५९ लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत. कागदपत्रे अपलोड करण्यासाठी सात दिवसांची मुदत देऊन विहित कालावधीत अपलोड न केल्यास लाभार्थ्यांचे अर्ज रद्द करण्याबाबतच्या सूचना तालुका कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत ७ हजार १६२ लाभार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पूर्वसंमती देण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी ३ हजार ७६१ लाभार्थ्यांनी देयके महाडीबीटी पोर्टलवर अपलोड केलेली आहेत, तर उर्वरित ३ हजार ८३७ लाभार्थ्यांनी देयके अपलोड केलेली नाहीत अशा लाभार्थ्यांना सात दिवसांची मुदत देऊन विहित कालावधीत देयके अपलोड न केल्यास लाभार्थीचे पूर्वसंमती अर्ज रद्द होतील. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी तत्काळ महाडीबीटी पोर्टलवर आपल्या लॉगीनमधून आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याबाबत आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी शेतकऱ्यांना केले आहे.