डॉक्टरांची उशिरा हजेरी; सीएसनेच तपासले रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:44 AM2021-06-16T04:44:42+5:302021-06-16T04:44:42+5:30
बीड : स्थलांतरित जिल्हा रुग्णालयातील ओपीडीमध्ये असणारे डॉक्टर सोमवारीही नेहमीप्रमाणे उशिरा आले. परंतु, ताटकळलेले रुग्ण पाहून खुद्द जिल्हा शल्य ...
बीड : स्थलांतरित जिल्हा रुग्णालयातील ओपीडीमध्ये असणारे डॉक्टर सोमवारीही नेहमीप्रमाणे उशिरा आले. परंतु, ताटकळलेले रुग्ण पाहून खुद्द जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी रुग्णांची तपासणी केली. उशिराने आलेल्या डॉक्टरांना पहिली वेळ असल्याने तोंडी सूचना देत आहे, नंतर असे घडल्यास कारवाई केली जाईल, असा दमही डॉ. साबळे यांनी डॉक्टरांना दिला. खुद्द सीएसने तपासणी केल्याने इतर डॉक्टर उशिरापर्यंत ओपीडीत ठाण मांडून होते.
जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा कारभार हाती घेतल्यापासून डॉ. सुरेश साबळे धावपळ करताना दिसत आहेत. कोविडसह नॉनकोविड रुग्णालयातही लक्ष घालून सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी एक भेट दिल्यानंतर सोमवारी सकाळी आणखी अचानक भेट दिली. यात त्यांना स्वच्छता व इतर काही सुधारणा झाल्याचे दिसले. परंतु, ओपीडीतील डॉक्टर उशिरानेच आल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले. यामुळे रुग्ण ताटकळले होते. हे पाहून डॉ. साबळे स्वत: स्त्रीरोग विभागात बसले आणि रुग्ण तपासणीला सुरुवात केली. पाच रुग्ण तपासणी झाल्यानंतर येथील महिला डॉक्टर धावत आल्या. सीएस डॉ. साबळे स्वत: ओपीडीत बसल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरल्यानंतर सर्वच डॉक्टर धावत आपल्या कक्षात येऊन बसले. यामुळे सोमवारी सर्वांना वेळेवर उपचार मिळाल्याचे दिसले.
फिजिशियन गायब; एका डॉक्टरकडे दोन पदभार
मेडिसीन ओपीडीत फिजिशियन न बसता कंत्राटी डॉक्टर होते. याच डॉक्टरवर वॉर्डमधील रुग्ण तपासणीची जबाबदारी होती. संपर्क केल्यानंतर डॉ. मुळे धावत आले. त्यांनी ओपीडीत बसून रुग्ण तपासले. परंतु, इतर सर्वच विभागात जे डॉक्टर ओपीडीत होते, त्यांच्यावरच वॉर्डमधील रुग्ण तपासण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली होती. केवळ ड्यूटींचे योग्य नियोजन नसणे आणि कामचुकारपणा करणाऱ्या डॉक्टरांनी आपसांत ॲडजस्टमेंट करून असे प्रकार केल्याचे समाेर आले आहे. यामध्ये सामान्य रुग्णांना त्रास होत आहे.
प्रसूती विभागात महिलेची तपासणी
प्रसूती विभागात तपासणी करताना एक महिला गंभीर होती. यावर डॉ. साबळे हे स्त्रीरोग तज्ज्ञ, परिचारिका यांना सोबत घेऊन तात्काळ कक्षात गेले. २० मिनिट तपासणी करून तिला सिझरला घेण्याचे सांगितले. डॉ. राजश्री शिंदे व प्रसूती विभागातील टीम येथे तत्पर असल्याचे दिसले.
--
स्थलांतरित रुग्णालयात डॉक्टर उशिराने आले. रुग्ण ताटकळलेले पाहून मीच तपासणी केली. पहिली वेळ असल्याने तोंडी सूचना केल्या आहेत. यापुढे थोडाही उशीर झाल्यास थेट कारवाई केली जाईल. तसेच वेगवेगळे डॉक्टर नियुक्त करण्यास सांगितले आहे. रुग्णांचे हाल होणार नाहीत, याची पूर्ण काळजी घेतली जाईल.
डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड
===Photopath===
140621\14_2_bed_1_14062021_14.jpeg
===Caption===
स्त्री रोग विभागात बसून महिला रूग्णांची तपासणी करताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे. बाहेर प्रतिक्षेतील रूग्णही दिसत आहेत.