मांजरा धरणाचे दरवाजे उघडण्यास उशीर, पाच गावांतील शेतात घुसले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 03:57 PM2020-11-03T15:57:17+5:302020-11-03T16:00:07+5:30
नुकसानीसाठी लातूर पाटबंधारे विभागाची हलगर्जीपणा कारणीभूत
अंबाजोगाई : तालुक्यातील धनेगाव प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरूनही लातूर पाटबंधारे विभागाने चार दिवस धरणाचे दरवाजे उघडले नाहीत. परिणामी क्षमतेपेक्षा धरणाची पाणीपातळी अधिक वाढल्याने बॅक वाॅटर पाच गावांतील शेतकऱ्यांच्या शेतात घुसून उभ्या पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केज विधानसभा मतदारसंघाच्या आ. नमिता मुंदडा यांनी केली आहे.
मांजरा धरणाची पूर्ण संचय पातळी ६४२.३७ मी. एवढी आहे. परतीच्या पावसामुळे पाण्याची आवक चांगली होऊन २७ ऑक्टोबर रोजी धरण पूर्ण क्षमतेने भरून पाणीसाठा २२४ दलघमी झाला, तरीदेखील पाण्याची आवक सुरू असल्याने धरणाचे दरवाजे उघडून अतिरिक्त साठ्याचा विसर्ग करणे आवश्यक होते. मात्र, लातूर पाटबंधारे विभागाने धरण भरून चार दिवस झाले तरी दरवाजे उघडलेच नाहीत. परिणामी पाणीपातळी ७ सेंमीने वाढून ६४२.४४ मी. झाल्याने बॅक वाॅटरचे पाणी सादोळा, भालगाव, सोनेसांगवी, सुर्डी या गावांतील शेतकऱ्यांच्या शेतात घुसले. यामुळे शेतीचे आणि उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीसाठी लातूर पाटबंधारे विभागाची हलगर्जीपणा कारणीभूत असल्याची तक्रार आ. नमिता मुंदडा यांनी रविवारी जलसंपदामंत्र्यांकडे करत झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचीही मागणी केली.
कालव्याऐवजी दरवाजांद्वारे सोडले पाणी
दरम्यान, शेतात पाणी घुसत असल्याची ओरड होऊ लागताच सोमवारी सकाळी मांजरा धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. या दरवाजांमधून सध्या ९.८९६ क्युसेक वेगाने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, कालव्यावाटे थोडे थोडे पाणी सोडायचे ठरले असताना चार दिवस उशीर करून नदीपात्राने पाणी सोडल्यामुळे पाणी वाया जात आहे. त्यामुळे दरवाजे बंद करून पाणी कालव्याद्वारे सोडण्यासाठी आ. नमिता मुंदडा सोमवारी रात्री उशिरापर्यंत प्रयत्नशील होत्या.