बीडसह ३५ जिल्ह्यांमध्ये कुष्ठरूग्ण शोध अभियानाला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:45 PM2019-09-14T12:45:25+5:302019-09-14T12:51:07+5:30
राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये आरोग्य विभागाच्यावतीने १३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत हे अभियान राबविले जाणार आहे.
बीड : जिल्ह्यात शुक्रवारपासुन कुष्ठरूग्ण शोध अभियानाला सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी आशा सेविकांच्या संपाचा परिणाम या मोहिमेवर जाणवला. हा संप मिटेपर्यंत आरोग्य कर्मचारीच घरोघरी जावून माहिती घेणार आहेत. राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये आरोग्य विभागाच्यावतीने १३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत हे अभियान राबविले जाणार आहे. असंसर्गजन्य आजाराचीही माहिती घेतली जात आहे. घाटनांदुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सभापती राजेसाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत या मोहिमेला सुरूवात झाली.
निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकर शोधून त्यांना तात्काळ औषध उपचाराखाली आणून नवीन कुष्ठरुग्ण शोधून विविध औषधोपचाराद्वारे या संसर्गाची साखळी खंडित करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. कुष्ठरोगाविषयी जनजागृती करून कुष्ठरोग निर्मूलनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी योग्य औषधोपचाराचे महत्त्व संबंधितांना पटवून दिले जात आहे. तसेच कुटूंबातील प्रत्येक व्यक्तिची आणि त्यांना असलेल्या आजाराची माहिती घेतली जात आहे. पथकाद्वारे गृहभेटी देऊन क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाचारण केले जात आहे. याबरोबरच असंसर्गजन्य रोगांचीही माहिती घेतली जात आहे. ३० वर्षापेक्षा अधिक वयोगटातील लोकांची शारीरिक तपासणी करून उच्च रक्तदाब मधुमेह व कर्करोग याबाबत सर्वेक्षण केले जात आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकृष्ण पवार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.कमलाकर आंधळे, यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यासाठी परिश्रम घेत आहेत.
अशी आहे यंत्रणा
हे सर्वेक्षण करण्यासाठी १ पुरूष व १ महिला असलेले १८६५ पथक, प्रत्येक ५ पथकामागे १ पर्यवेक्षक असे ३६९ पर्यवेक्षक काम पहात आहेत. ग्रामीण १०० टक्के तर शहरात ३० टक्के सर्वेक्षण करण्याचे उद्दीष्ट आरोग्य विभागासमोर आहे. आरोग्य सेवक, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आरोग्य सहायीका, आरोग्य सहायक यांनी पहिल्या दिवशी सर्वेक्षण केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक
या विषयासह आरोग्य विभागातील इतर विविध प्रश्नांवर जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांण्डेय यांच्या अध्यतेखाली बैठक झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, क्षयरोग अधिकारी डॉ.कमलाकर आंधळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी, सीईओ व आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटना सल्लागार डॉ. संजय सुर्यवंशी हे मोहिमेची माहिती घेत आहेत.
संप मिटल्यास वेग येईल
१३ ते २८ सप्टेंबरदरम्यान ही मोहीम चालणार आहे. पीएचसीतील कर्मचाऱ्यांनीच पहिल्या दिवशी माहिती घेतली. आशांचा संप मिटल्यावर मोहिमेत आणखी गती येईल. हे उद्दीष्ट यशस्वी पूर्ण करण्यासाठी यंत्रणा काम करीत आहे. नागरिकांनीही सहकार्य करावे. जिल्हाधिकारी, सीईओ, डीएचओ, सीएस यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. बैठकही झाली.
- डॉ.कमलाकर आंधळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी, बीड