लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 12:06 AM2024-10-12T00:06:29+5:302024-10-12T00:08:33+5:30

ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही आपण दसरा मेळाव्याला जाणार असल्याचं सांगितलं आहे.

Laxman Hake also supports Pankaja Munde Announcing his attendance at the Dussehra gathering | लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...

लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...

Pankaja Munde ( Marathi News ) : भाजप नेत्या आणि विधानपरिषद आमदार पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दरवर्षीप्रमाणे यंदाही सावरगाव येथील भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याला प्रथमच पंकजा यांचे बंधू आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार असून आता ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही आपण या मेळाव्याला जाणार असल्याचं सांगितलं आहे.

पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला जाणार असल्याची माहिती देताना लक्ष्मण हाके यांनी म्हटलं की, "मी उद्या सावरगाव इथं भगवान भक्तीगडावर संत भगवानबाबा आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी येत आहे. महाराष्ट्रातील तमाम ओबीसी आणि बहुजन बांधवांनी वाजत-गाजत उद्या भगवान भक्तीगडावर यावं. आपला स्वाभिमान आणि आपल्या अस्तित्वाची ही लढाई आहे. त्यामुळे सर्वांनी उद्या विचारांचे सोने लुटण्यासाठी यायचं आहे. मी येणार आहे, तुम्हीही नक्की या," असं आवाहन हाके यांनी केलं आहे.

बीडमध्ये उद्या दोन मेळावे लक्ष वेधून घेणार!

श्रीक्षेत्र नारायणगडावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचाही १२ ऑक्टोबरलाच दसरा मेळावा होत आहे. या ठिकाणी लाखो समाजबांधव येतील, असा दावा केला आहे. जरांगे यांनी सातत्याने ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे. राज्यभरात यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा असे चित्र उभे राहून याचा फटका लोकसभा निवडणुकीत अनेक उमेदवारांना बसला. आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रथमच जरांगे यांचा दसरा मेळावा होत आहे. हा मेळावा केवळ मराठ्यांचा नसून सर्वांचा आहे असे जरांगे यांनी जाहीर केले असले तरी या मेळाव्याच्या माध्यमातून ते कोणती भूमिका मांडतात याकडेही लक्ष आहे. यासोबतच मुंडे भाऊ- बहीण राज्यातील बदलत्या राजकीय आणि सामाजिक वातावरणात कोणती भूमिका मेळाव्यातून मांडतात याकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे.

Web Title: Laxman Hake also supports Pankaja Munde Announcing his attendance at the Dussehra gathering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.