जावयाला मारहाण करून माय-लेकीचे दागिने लुटणाऱ्या चोरट्यांना एलसीबीने ठोकल्या बेड्या
By सोमनाथ खताळ | Published: September 9, 2023 06:04 PM2023-09-09T18:04:46+5:302023-09-09T18:04:56+5:30
या दोन्ही चोरट्यांना गेवराई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले
बीड : गेवराई तालुक्यातील नागझरी वस्तीवर राहणाऱ्या सालगड्याला मारहाण करून त्यांची पत्नी व सासूच्या अंगावरील दागिने लंपास केले होते. ही घटना २३ ऑगस्ट रोजी घडली होती. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने तिघांपैकी दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून दोन मोबाईल जप्त केले असून सोन्याचा तपास सुरू आहे. या दोन्ही चोरट्यांना गेवराई पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
परमेश्वर नानाभाऊ गायकवाड (रा.टेंभी तांडा राजपिंप्री) व नाना विनायक माळी (रा.संजयनगर गेवराई) अशी पकडलेल्या चोरट्यांची नावे आहेत. गेवराई तालुक्यातील नागझरी येथै डॉ.दैववान बांगर यांच्या शेतात गणेश भिमराव मोरे हे सालगडी आहेत. २३ ऑगस्ट रोजी रात्री पत्नी व सासूसोबत त्यांनी जेवण केले. त्यांची सासू बाहेर हात धुण्यासाठी गेल्या असता त्यांना बाहेर कोणी तरी असल्याचे दिसले. मोरे यांनी बाहेर येताच त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांची पत्नी व सासूच्या अंगावरील सोने व मोबाईल घेऊन तीन चोरट्यांनी धूम ठोकली. जवळपास १ लाख ३९ हजार रूपयांचा मुद्देमाल या चोरट्यांनी लंपास केला होता.
याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर लगेच स्थानिक गुन्हे शाखेने तपास हाती घेत शनिवारी दोन चोरट्यांना बेड्या ठोकल्या. अजूनही एक फरार आहे. ही कारवाई गेवराई बसस्थानकावर करण्यात आली. त्यांना गेवराई पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पोउपनि श्रीराम खटावकर, मनोज वाघ, प्रसाद कदम, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, अश्विनकुमार सुरवसे, सचिन आंधळे, नारायण कोरडे, चालक अशोक कदम आदींनी केली.