बीडमध्ये टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या दोन ‘टेक्निशिअन’ला एलसीबीने केले गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 05:46 PM2019-02-11T17:46:17+5:302019-02-11T17:46:41+5:30
दोन्ही चोरटे टॉवरमध्ये ‘टेक्निशिअन’ म्हणून कार्यरत होते.
बीड : टॉवरमध्ये ‘टेक्निशिअन’ म्हणून रूजू झाले. काही दिवस चांगले काम केले. नंतर त्यांनी आपल्या कामातील ‘टेक्निक’ चोरीसाठी वापरली. जेथे काम करीत होते, तेथीलच बॅटऱ्या चोरल्या. अशा बॅटऱ्या चोरणाऱ्या दोन ‘टेक्निशिअन’ ला स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. त्यांनी दोन गुन्हेही कबुल केल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते.
भाऊसाहेब हरीश्चंद्र हंडिबाग (३२ रा.केज) व सुनिल भगवान नेहरकर (२२ रा.धावडी ता.अंबाजोगाई) अशी पकडलेल्या दोन चोरांची नाव आहेत. त्यांचा अन्य एक सहकारी अद्यापही फरार आहे. केज, अंबाजोगाई, धारूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून टॉवरच्या बॅटऱ्या चोरीचे गुन्हे वाढले होते. धारूर, युसूफवडगाव पोलीस ठाण्यात तशी नोंदही झाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपास आपल्या हाती घेतला. सपोनि अमोल धस यांनी कौशल्यपूर्ण तपास करून दोघांना ताब्यात घेतले. खाक्या दाखविताच त्यांनी आपले गुन्हे कबुल केले.
दरम्यान, दोन्ही चोरटे टॉवरमध्ये ‘टेक्निशिअन’ म्हणून कार्यरत होते. त्यांना काय केल्यावर काय होऊ शकते, याची जाणीव होती. त्यामुळेच त्यांनी चार बॅटऱ्या असतील तर तीन चोरायच्या आणि एक जागेवर ठेवायची. शेवटच्या बॅटरीची चार्जिंग संपल्यानंतर संबंधित कंपणीला संदेश जायचा. तोपर्यंत या चोटऱ्यांनी संपर्णू प्रक्रिया पार पाडलेली असायची. मात्र एलसीबीच्या तावडीतून ते सुटू शकले नाहीत. त्यांचा अन्य एक साथीदार अद्यापही फरार असून त्याला लवकरच ताब्यात घेऊ, असे सपोनि धस यांनी सांगितले. सध्या दोन्ही चोरटे धारूर पोलिसांच्या ताब्यात आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर पोनि घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल धस, भास्कर केंद्रे, कल्याण तांदळे, राजू वंजारे आदींनी केली.