महापुरुषांऐवजी कार्यालयात लावला चक्क स्वतःचाच फोटो; बीड जिल्ह्यात तलाठ्याचा प्रताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 03:31 PM2021-11-25T15:31:13+5:302021-11-25T15:36:46+5:30
तलाठ्याने स्वतःचाच फोटो लावणे हा धक्कादायक असून याप्रकरणाची चौकशी करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार विनोद गुंड्डमवार यांनी सांगितली आहे.
- नितीन कांबळे
कडा ( बीड ) : शासकीय असो कि निम शासकीय कार्यालय तेथे महापुरुषांचे फोटो कार्यालयात लावणे बंधनकारक आहे. मात्र, एका तलाठ्याने कार्यालयात महापुरुषांच्या ऐवजी चक्क स्वतःचा फोटो लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आष्टी तालुक्यातील टाकळसिंग सज्जा येथे कार्यरत अरुण मोरे यांनी हा प्रताप केला आहे. स्वतःचा सैनिकाच्या गणवेशातील फोटो त्यांनी कार्यालयात दर्शनी भागात लावल्याचे दिसत आहे.
आष्टी तालुक्यातील टाकळसिंग सज्जा ला नेमणूक असलेले तलाठी अरुण मोरे यांचे कार्यालय आष्टीत कृषी उत्पन्न बाजार समीती आवारात आहे. कार्यालयात महापुरुषांचे फोटो असणे लावण्याचा मोरे यांना विसर पडल्याचे दिसून आले. धक्कादायक म्हणजे, एकाही महापुरुषाचा फोटो न लावणाऱ्या तलाठी मोरे यांनी चक्क स्वतःचा फोटो कार्यालयात लावला आहे. आज सकाळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी कार्यालयात जाऊन पाहणी केली असता हे उघडकीस आले. हे निंदनीय असून तलाठी मोरे यांच्यावर वरिष्ठांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल साळवे, दिपक जाधव यांनी केली आहे.
महापुरुषांची आणि माझी बरोबरी नाही
फोटो फ्रेम करून बॅग मध्ये ठेवला होता. फोटो फ्रेम गावाकडे नेयची होती, मात्र, काही मुलांनी तो फोटो भिंतीवर लावला. महापुरुष आणि माझी बरोबरी होऊ शकत नाही.
- अरुण मोरे, तलाठी, टाकळसिंग सज्जा
चौकशी करून कारवाई
शासकीय नियमांनुसार कार्यालयात महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत. पण तलाठ्याने स्वतःचाच फोटो लावणे हा धक्कादायक प्रकार आहे. याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
- विनोद गुंड्डमवार, तहसीलदार, आष्टी