पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडलं; विहिर खोदताना जिलेटीन स्फोटात तिघांनी जीव गमावला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 06:48 PM2023-04-19T18:48:14+5:302023-04-19T18:52:00+5:30
नाशिक येथे विहीरीचे खोदकाम करताना अचानक जिलेटीन स्फोट झाल्याने घडली घटना
- नितीन कांबळे
कडा : हाताला काम नसल्याने आष्टी तालुक्यातील तिघांनी काही दिवसांपूर्वी मित्राच्या पोकलेन मशिनवर मजूर कामासाठी नाशिकची वाट धरली. मात्र, विहीर खोदकाम करताना जिलेटीन स्फोटात तिघांनी जीव गमावल्याची घटना बुधवारी सकाळी हिरडी येथे घडली. लहू जालिंदर महाजन (३६, राळसांगवी), आबा एकनाथ बोराडे (३५, बोरडवाडी) आणि बिभीषण श्यामराव जगताप (३७, धिर्डी ) अशी मृतांची नाव आहेत.
आष्टी तालुक्यातील लहू जालिंदर महाजन, आबा एकनाथ बोराडे, बिभीषण श्यामराव जगताप तिघेजण धिर्डी येथील नारायण भिताडे यांच्या मालकीच्या पोकलेन मशिनवर मजुरीच्या कामासाठी नाशिकला गेले होते. नाशिक येथील हिरडी ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहीरीचे खोदकाम सुरू होते. येथे खोदकामासाठी जिलेटीनच्या कांड्या लावत असताना अचानक स्फोट झाला. यात लहू महाजन, आबा बोराडे, बिभीषण जगताप या तिन्ही मजुरांचा जागीच मृत्यू झाला. पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडलेल्या तिन्ही तरुणावर काळाने घाला घातल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.