अंबाचौंडी परिसरात आढळला बिबट्या; शेतकरी भयभीत, भाविकानी दक्षता बाळगावी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 10:05 PM2024-02-07T22:05:53+5:302024-02-07T22:06:06+5:30
वानविभागाकडून बिबट्या असल्याची पुष्टी
धारूर (बीड): धारूर शहरापासून 3 किमी डोंगराळ परिसरात अंबाचौंडी येथे बुधवारी सकाळी बिबट्या निदर्शनास आल्याने शेतकरी भयभीत झाले. या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी दक्षता बाळगावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या भागात बिबट्या असल्याच्या वृत्ताला धारूर वन परीक्षेत्र कार्यालयाकडून दुजोरा मिळाल्याने तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा, आशी मागणी या भागातील शेतकरी व नागरीकातून होत आहै.
धारूर शहराच्या पश्चीमेस 3 किमी डोंगराळ भागात श्री क्षेत्र अंबाचोंडी देवीचे मंदीर व शेती परिसर आहे. या भागात पाण्याची उपलब्धता असल्यामुळे वान्य प्राण्याचे वास्तव्य वाढले आहे. बुधवारी सकाळी शेतकरी शिवाजीराव जाधव यांना शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळल्याने त्यांनी तेथून पळ काढला. यानंतर भाविकांनी या परिसरात दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. आता धारूर वनपरीक्षेत्र कार्यालयाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी माजी नगरसेवक व या भागातील शेतकरी बालासाहेब जाधव यांनी केली आहे. या भागात बिबट्या नजरेस येण्याची चौथी वेळ आहे, त्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत.