ऑनलाईन कार्यशाळेतून पेरणीच्या सुधारित तंत्राचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:23 AM2021-06-10T04:23:14+5:302021-06-10T04:23:14+5:30

पेरणी योग्य होण्यासाठी गावपातळीवरील ट्रॅक्टरचालक, मालक, शेतकरी यांना सुधारित पेरणी तंत्र अवगत करून देणे आवश्यक असल्याने बीबीएफ पेरणीचे प्रात्यक्षिक ...

Lessons on improved sowing techniques from online workshops | ऑनलाईन कार्यशाळेतून पेरणीच्या सुधारित तंत्राचे धडे

ऑनलाईन कार्यशाळेतून पेरणीच्या सुधारित तंत्राचे धडे

Next

पेरणी योग्य होण्यासाठी गावपातळीवरील ट्रॅक्टरचालक, मालक, शेतकरी यांना सुधारित पेरणी तंत्र अवगत करून देणे आवश्यक असल्याने बीबीएफ पेरणीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण केज तालुक्यातील बनसारोळा येथील क्रांतिज्योती शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रक्षेत्रावर दाखविण्यात आले आणि याचे थेट प्रक्षेपण व्हिडिओ कॉन्फरन्सचा वापर करीत ऑनलाइन दाखविण्यात आले.

बीड कृषी विभागाने मंगळवारी (दि. ८) आयोजित केलेल्या या ऑनलाईन कार्यशाळेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे यांनी शेतकऱ्यांना रुंद वरंबा सरी पेरणी तंत्रज्ञान अवलंबण्याचे आवाहन केले.

कृषी विज्ञान केंद्र, डिघोळ अंबाचे कृषी अभियंता प्रमोद रेणापूरकर यांनी बीबीएफ टोकन यंत्राची ओळख व उपयोगिता तपशील, पिकांच्या दोन ओळींतील अंतरानुसार टोकन यंत्राच्या भागाची योग्य जुळवणी या तांत्रिक बाबींची माहिती दिली.

प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी प्रगतिशील शेतकरी श्रीकांत काकडे यांच्यासोबत संवाद साधत बीबीएफ पद्धतीने सोयाबीनची पेरणी केल्यास एकरी आठ किलो बियाण्यांची व खताची बचत होऊन खर्चातही बचत होते.

मूलस्थळी जलसंधारण होत असल्याने कमी पाऊस झाल्यास सरीमुळे जास्त काळ ओलावा टिकून राहतो; तसेच जास्त पाऊस झाल्यास अतिरिक्त पाणी शेताच्या बाहेर निघून जाते. सरीमुळे हवा खेळती राहते व पिकास भरपूर सूर्यप्रकाश मिळतो; त्यामुळे शेंगा चांगल्या भरतात. परिणामी पीक उत्पादन वाढीस मदत होते. सरीवरंबा पद्धतीने पेरणी केल्यास उत्पादनात २५ ते ३० टक्के वाढ झाल्याची चर्चा घडवून आणली व क्रांतिज्योती शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रक्षेत्रावर ट्रॅक्‍टरचलित बीबीएफ यंत्राच्या साहाय्याने पेरणी करून दाखविण्यात आली. प्रगतिशील शेतकरी दिलीप फुके यांनी बीबीएफ पेरणी करताना ट्रॅक्टरचालकांच्या होणाऱ्या चुका व शेतकऱ्यांमधील पसरलेले गैरसमज या संदर्भात माहिती देऊन या समस्या सोडविण्यासंदर्भात विस्तृतपणे मार्गदर्शन केले.

पेरणीकरिता बीबीएफ पेरणी यंत्र उपलब्ध होत नसल्यास पारंपरिक पेरणी यंत्राचा तिफणीचा एक नळा बंद ठेवून पेरणी करावी व पेरणीनंतर तीन ते चार आठवड्यांत रिजर किंवा बळिराम नांगराच्या साहाय्याने प्रत्येक तीन ते चार ओळींनंतर सरी काढाव्यात, तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पांतर्गत बीबीएफ पद्धतीने पेरणी केल्यास प्रकल्प क्षेत्रातील शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी १००० रुपये अनुदान देण्यात येईल. त्यासाठी डीबीटी पोकरा वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन शिवप्रसाद येळकर यांनी केले.

कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी कृषी साहाय्यक पंडित काकडे, प्रकल्प विशेषज्ञ मनुष्यबळ विकास जयशिव जगधने, प्रकल्प साहाय्यक प्रताप मुंडे, प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद येळकर, प्रगतिशील शेतकरी श्रीकांत काकडे, बीबीएफ यंत्रचालक अशोक खडबडे, संतोष भिसे, विशाल गोरे, शेतीशाळा प्रशिक्षक दशरथ उबाळे, अनुराधा वावळ, अमोल सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

===Photopath===

090621\narshingh suryvanshi_img-20210609-wa0011_14.jpg

Web Title: Lessons on improved sowing techniques from online workshops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.