'मराठवाड्यात चांगला पाऊस पडू दे'; प्रभू वैद्यनाथाला भाविकांचे साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 02:48 PM2019-08-19T14:48:51+5:302019-08-19T14:53:59+5:30
तिसऱ्या श्रावण सोमवारी भाविकांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन
परळी (बीड ) : श्रावणातील तिसऱ्या सोमवारीही श्री वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी परळी शहर, तालुक्यातील भाविकांसह राज्यभरातून शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. दुपारपर्यंत हजारो भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. तिसरा सोमवार, संकष्ट चतुर्थी, तसेच जिल्हाधिकारी जाहीर सुटी यामुळे दुपारी 12 वाजेपर्यंत सुमारे सव्वा लाख भाविकांनी वैद्यनाथ प्रभूचे दर्शन घेतल्याची माहिती आहे.
राज्य व देशभरातून भाविक परळी शहरात दर्शनासाठी आले आहेत. चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, राज्यभरात मोठा पाऊस पडत असतांनाही बीडसह संपूर्ण मराठवाडा पावसाअभावी अजूनही कोरडाच असल्याने शेतकरी व नागरिकांकडून चांगल्या पावसाची श्री वैद्यनाथ चरणी प्रार्थना केली जात आहे.
द्वादश ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील श्री वैद्यनाथ प्रभूंच्या दर्शनासाठी शिवभक्तांची तिसऱ्या श्रावण सोमवारी (दि.१९ ) मोठी गर्दी झाली होती. श्रावणातील प्रत्येक दिवस महत्वाचा असला तरी सोमवारी महादेवाचे दर्शन घेण्यासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी होत असते. दरम्यान आज श्रावण सोमवारी परळी शहरात जणू काही शिवभक्तांची जत्राच भरल्याचे चित्र दिसून येत होते. त्यातच आज श्रावणातील तिसरा सोमवार असल्याने दुपारपर्यंत लाखो भाविकांनी वैद्यनाथ प्रभुंचे दर्शन घेतले. वैद्यनाथ देवस्थानच्यावतिने सचिव राजेश देशमुख व त्यांच्या सर्व विश्वस्त सहकाऱ्यांनी भाविकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
वैद्यनाथ देवस्थानच्यावतिने भाविकांसाठी नेहमी प्रमाणेच स्त्री, पुरूष व पासधारक अशा स्वतंत्र रांगा ठेवण्यात आल्या आहेत. पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आहे. आज वैद्यनाथ मंदिरातील सर्व पायऱ्या भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहेत. गर्दीचा फायदा घेवून कोणताही अनुचित प्रकार होवू नये यासाठी मंदिराच्या पहिल्या पायरीपासून बाहेर पडण्याच्या दारापर्यंत जागोजागी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ओम नम: शिवाय, हर हर महादेव असा एकच गजर करीत भाविकांनी आपले मस्तक वैद्यानाथाच्या चरणी ठेवले. तसेच चांगल्या पावसाची मागणी वैद्यनाथ प्रभूंकडे केली.
खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनी घेतले दर्शन
आज श्रावण सोमवारी बीडच्या खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनी सकाळी प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले . यावेळी त्यांनी वैद्यनाथ भगवानची मनोभावे पूजा व आरती केली. वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव राजेश देशमुख यांनी खा. मुंडे यांचे स्वागत केले.