महाराष्ट्र संतांची भूमी सुखी राहू दे.. कोरोना टळू दे, देवा कोरोना टळू दे...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:41 AM2021-06-09T04:41:48+5:302021-06-09T04:41:48+5:30
विजयकुमार गाडेकर लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर : येथील शासकीय कोविड सेंटरमध्ये शुक्रवारी गोंधळ गीते सादर करून गोंधळ घातला. यावेळी ...
विजयकुमार गाडेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर : येथील शासकीय कोविड सेंटरमध्ये शुक्रवारी गोंधळ गीते सादर करून गोंधळ घातला. यावेळी गोंधळी कलाकारांनी विविध गोंधळी लोककला सादर केल्या. महाराष्ट्र संतांची भूमी सुखी राहू दे..
कोरोना टळू दे, देवा कोरोना टळू दे...या गाण्यावर कोरोनाबाधित रुग्णांनीही ठेका धरला होता. यामुळे त्यांनाही कोरोनाचा विसर पडला होता.
कोविड सेंटरमधे कवड्यांची माळ गळ्यात घालून ढोलकी, झांजरी गीते सादर करून गोंधळ घातला. कोरोनाबाधित रुग्णांना चैतन्य व ऊर्जा देण्यासाठी औषधी, पौष्टिक आहाराबरोबरच संगीताचा बाज आणि गोंधळ गीतांचा साज चढवत गोंधळ घालण्यात आला. वैष्णवी देवी संस्था (कान्होबाची वाडी) यांच्या वतीने वासुदेव, बहुरूपी, भारूड, अभंग निरूपण आदी कार्यक्रम घेतले गेले होते. विविध कलांच्या माध्यमातून रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आराधींनी देवी-दैवताला साकडे घातले. महाराष्ट्र कोरोनामुक्त होऊ दे.. अशी गाणी गायली.
लक्ष्मण बनसोडे, कौसाबाई जाधव, सुशीला जाधव, सखाराम शिंदे, गयाबाई तावरे, महादेव धनवडे, पार्वती मुळे, रामकिसन मुलाखे, रावसाहेब कांबळे, अर्जुन मोरे या गोंधळी कलाकारांनी गोंधळी गीते सादर केली. योगा शिक्षक प्रा. केशव भागवत यांनी आभार मानले. कलाकारांना उपजीविकेसाठी व्यासपीठ मिळत नसल्याची खंत व्यक्त केली.
कार्यक्रमास विस्तार अधिकारी बागडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास खाडे, डॉ. किशोर खाडे, अमोल कुलकर्णी, विष्णू सव्वासे यांची उपस्थिती होती.
....
भैरवी, आरतीने सांगता
एका कोरोनाबाधित रुग्णाने देखील भक्तिगीत सादर करून गोंधळात सहभाग घेतला. सर्व बाधित रुग्णांचे मनोधैर्य प्रबल करण्याचा यशस्वी प्रयत्न या माध्यमातून केला गेला. जेजुरीच्या खंडेराया.. कोरोना टळू दे... तुळजापूरची भवानी माता.. कोरोना टळू दे... अशा गाण्यांबरोबरच शेवटी देवीची भैरवी, आरती करून गोंधळाची सांगता केली.
....
===Photopath===
070621\vijaykumar gadekar_img-20210606-wa0048_14.jpg
===Caption===
शिरुरकासार येथील शासकीय कोविड रुग्णालयात गोंधळ गिते सादर करताना लोककलावंत.