महिलेला लुटून खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 06:08 PM2018-10-31T18:08:19+5:302018-10-31T18:09:25+5:30

दुध व दही विक्री करणाऱ्या एका महिलेस लुटून तिचा खून केल्याप्रकरणी केल्याप्रकरणी रेणापूर येथील तरुणास दोषी ठरवत जिल्हा व सत्र न्यायालयात न्या. अनिल सुब्रमण्यम यांनी जन्मठेप व दहा हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली.  

Life imprisonment to a murderer of women | महिलेला लुटून खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

महिलेला लुटून खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

googlenewsNext

अंबाजोगाई (बीड) : दुध व दही विक्री करणाऱ्या एका महिलेस लुटून तिचा खून केल्याप्रकरणी केल्याप्रकरणी रेणापूर येथील तरुणास दोषी ठरवत जिल्हा व सत्र न्यायालयात न्या. अनिल सुब्रमण्यम यांनी जन्मठेप व दहा हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली.  

परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव येथील मीनाबाई माणिक मुंडे (वय ५५) यांचा दही व दुध विक्रीचा व्यवसाय होता. नित्यनेमाप्रमाणे ७ जानेवारी २०१५ रोजी सकाळी ७ वाजता मीनाबाई दादाहारी वडगाव कॅम्पकडे  टोपल्यात दही व दुधाचे कॅण्ड ठेऊन पाउलवाटेने जात होत्या. या दरम्यान त्यांच्यावर पाळत ठेवणारा ढाब्यावरील वेटर शंकर विठ्ठल खारे याने त्यांचा पाठलाग केला. शंकरने मीनाबाई यांना पाठीमागून लाकडाने मारहाण केली व साडीने गळा आवळत त्यांचा खून केला. यानंतर त्याने मीनाबाई यांच्या गळ्यातील सोन्याचांदीचे दागिने लुटले. 

मीनाबाई दुध व दही विक्री करून परत न आल्याने नातेवाईकांनी त्यांची शोधाशोध सुरु केली. तरीदेखील महिला मिळून न आल्याने पती माणिक मुंडे यांनी परळी ग्रामीण पोलिसात पत्नी गायब झाल्याची तक्रार दिली. यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक व्ही.ए. पल्लेवाड यांनी आसपास शोध सुरु केला. दादाहरी वडगाव कॅम्पकडे जाणाऱ्या पाउलवाटे लगत असलेल्या सोळंके यांच्या ढाब्यावर चौकशी सुरु केली. यात रेणापूर येथील शंकर विठ्ठल खारे हा वेटर गायब असल्याचे समजले. यानंतर ढाबा मालकास सदरील गायब असलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी रेणापूर गाठले. तिथे त्याच्या राहत्या घरी आरोपी आढळून आला. पोलीस पाहताच बिथरलेल्या अवस्थेत आरोपी दिसल्याने पोलिसांना त्याच्याबद्दल संशय बळावला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच या घटनेतील मुद्देमाल त्याने पोलिसांना दिला. या प्रकरणाचा अधिक तपास करून दोषारोपपत्र येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. 

या प्रकारणाची सुनावणी न्या. अनिल सुब्रमण्यम यांच्यासमोर झाली. सरकार पक्षाच्या वतीने दहा साक्षीदार तपासण्यात आले. साक्ष पुरावा होत असताना आरोपीकडून जप्त केलेले दागिने, घटनास्थळावर आरोपीची उपस्थिती दर्शविणारा साक्षीदार, तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वपूर्ण ठरल्या. वरील युक्तिवाद व साक्ष ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्या. अनिल सुब्रमण्यम यांनी आरोपीस कलम ३०२ भा.दं.वि. प्रमाणे जन्मठेप व १० हजारांचा दंड तर कलम ३९२ (जबरी चोरी) अन्वये तीन वर्षाची शिक्षा व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्या वतीने ॲड. लक्ष्मण फड यांनी काम पहिले. त्यांना ॲड. दिलीप चौधरी, ॲड. एन.डी. शिंदे, पैरवी अधिकारी म्हणून जी.पी. कदम यांनी सहकार्य केले. या निकालाकडे संपूर्ण परळी तालुक्याचे लक्ष लागले होते. 

युक्तिवाद ऐकताच आरोपीने हातकडीसह पळण्याचा प्रयत्न :
दादाहारी वडगाव येथील महिलेची लूट व खून प्रकरणात आज निकाल हाती लागणार असल्याने लातूरच्या कारागृहातील आरोपी बसने अंबाजोगाईकडे आणला होता. बसमध्ये बसल्यानंतर त्याच्या खिशातील करवतीने दोरी कापली होती व खिशामध्ये चटणीची पूड देखील आढळून आली. सदरील खून प्रकरणाचा युक्तिवाद ऐकताच आरोपीने न्यायालय परिसरातून पळ काढला. मात्र, पोलिसांनी मोठ्या शिताफीने शिवाजी चौकातच त्याच्या मुसक्या आवळल्या. या झटापटीत बंदोबस्तासाठी असलेले पोलीस देखील किरकोळ जखमी झाले.  

सालगड्याच्या माहितीवरून लागला आरोपीचा सुगावा :
मीनाबाई मुंडे या दादाहारी वडगाव कॅम्पकडे दही व दुध विक्रीसाठी नेहमीप्रमाणे दोन्ही उसाच्या मध्यभागी असलेल्या पाऊलवाटेने जात असल्याचे सालगड्याने पहिले. घटनेच्या अर्ध्या तासानंतर आरोपी दागिन्याचे गाठोडे घेऊन त्याच पाऊलवाटेने परत आल्याचे त्याने पहिले होते. सदरील महिलेचा शोधाशोध सुरु झाल्यानंतर त्या सालगड्याने नातेवाईकांना ढाब्यावरील वेटरला य पाऊलवाटेवर पाहिल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांचा तपास सुकर झाला.

Web Title: Life imprisonment to a murderer of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.