चारपिढ्यांपासून जीवघेणी कसरत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:34 AM2021-09-19T04:34:48+5:302021-09-19T04:34:48+5:30
अनिल लगड/ पावसाळ्यात कांबळी नदीला पूर आला की आमचा दहा, दहा दिवस गावाशी संपर्क तुटतो. पूर्वीच्या दोन पिढ्यांना तर ...
अनिल लगड/
पावसाळ्यात कांबळी नदीला पूर आला की आमचा दहा, दहा दिवस गावाशी संपर्क तुटतो. पूर्वीच्या दोन पिढ्यांना तर पावसाळ्याच्या दिवसात उपाशी राहून दिवस काढावे लागले. आताही आमच्यासह आमच्या लेकरा-बाळांना डोक्यावर घेऊन आम्हाला कंबरेइतक्या पाण्यातून नदीपार करावी लागते. आमच्या चारपिढ्या नेते, अधिकाऱ्यांच्या हातापाया पडल्या. पण आश्वासनापलीकडे आम्हाला काहीच मिळाले नाही. आमची नदी पार करण्याची जीवघेणी कसरत सुरूच आहे. अशी व्यथा हिवरा गावातील एका वस्तीवरील ग्रामस्थांनी ‘लोकमत’पुढे मांडल्या.
....
आष्टी तालुक्यातील हिवरा हे अडीच हजार लोकवस्तीचे गाव. या गावातून कांबळी नदी वाहते. धानोरा-सावरगाव रस्त्यावर चारवेळा ही नदी आडवी येते. पिंपरखेड, सुलेमान देवळा येथे या नदीवरील पूल कमी उंचीचा असल्याने अनेकवेळा पुलावरून पाणी वाहते. यावेळी वाहतूक ठप्प होते. दोन दोन दिवस अनेक गावांचा संपर्क तुटतो. हिवरा गावातून भोजेवाडी, दादेगावकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावरून जाताना चव्हाण, लगड या मोठ्या वस्त्या आहेत. या वस्त्यांचा तर गावांशी दहा, दहा दिवस संपर्क तुटतो. पावसाळ्यात दोन दोन महिने सायकल, दुचाकीदेखील जात नाही. शेतकऱ्यांच्या शेतीमालाची वाहतूक करता येत नाही. गावातील डेअरीला दूध घालता येत नाही. पावसाळ्यात पुराच्या दिवसात अनेक वेळा दूध ओतून द्यावे लागते. मुलांच्या शिक्षणाची हेळसांड होते. अनेक दिवस घरीच रहावे लागते. नदी पार करताना मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पालकांसमोर असतो.
५० वर्षांपासून प्रश्न सुटेना
गेवराई तालक्यातील चकलांबा-चोरपुरी रस्त्यावर चिखलात जीप फसून एका चाळीस वर्षे महिलेला उपचाराअभावी जीव गमवावा लागला. ही घटना ताजी असताना हिवरा गावातील या वस्तीवरील नागरिकांना कोणी आजारी पडले तर काय होईल याची कल्पनात न केलेली बरी. गेल्या ५० वर्षांपासून या वस्तीवरील शेतकरी आदिवासींसारखे जीवन जगत आहेत. हिवरा-दादेगाव रस्त्याचे कामात या ठिकाणी पूल उभारावा, अशी मागणी सरपंच केशव चव्हाण, बाबूराव चव्हाण, रामेश्वर चव्हाण, महादेव काळे व ग्रामस्थांनी ७ सप्टेंबर रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे.
....
मंजूर झालेला रस्ता गेला कुठे?
भाजप-सेना युती सरकारने दोन वर्षांपूर्वी हिवरा-दादेगाव रस्त्याला मंजुरी दिली होती. या रस्त्याच्या कामाचा शुभारंभही झाला. निधीही मंजूर झाला होता. रस्त्याच्या कामावर मजूरही दाखल झाले होते. परंतु कोरोनाच्या संकटाने काम रखडले असे सांगितले. मजूर परत गेले. पण, या रस्त्याचे पुढे काय झाले? याचे कोडे मात्र उलगडले नाही. तरी या रस्त्याच्या पुन्हा गती द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
180921\18_2_bed_6_18092021_14.jpg~180921\18_2_bed_7_18092021_14.jpg
कांबळी नदीतून जीवघेणा प्रवास