चुरशीच्या लढतीमध्ये प्रकाश सोळंकेची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 01:14 AM2019-10-25T01:14:38+5:302019-10-25T01:16:23+5:30
माजलगाव विधानसभा मतदार संघाच्या अटीतटीच्या ठरलेल्या निवडणुकीत माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार रमेश आडसकर यांचा धक्कादायक असा बारा हजार मतांनी पराभव करत पुन्हा प्रकाश पर्व उभारले.
माजलगाव : माजलगाव विधानसभा मतदार संघाच्या अटीतटीच्या ठरलेल्या निवडणुकीत माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार रमेश आडसकर यांचा धक्कादायक असा बारा हजार मतांनी पराभव करत पुन्हा प्रकाश पर्व उभारले.
भारतीय जनता पक्षाचे रमेश आडसकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके यांनी मतात आघाडी प्रस्थापित केली. मतदार संघातील २७ फेऱ्यात १५ टेबलावर झालेल्या मतमोजणीत माजी मंत्री प्रकाश सोळंके यांचा १२ हजार ८९० मतांनी त्यांचा विजय झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषित केले. विजयी उमेदवार प्रकाश सोळंके याना १ लाख ११ हजार ५६६ मते तर भाजपचे रमेश आडसकर याना ९८ हजार ६७६ मते जनतेने त्यांच्या पारड्यात टाकले.
सुरुवातीपासून अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवाराने आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. यात माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी भावनिक करत शेवटची संधी द्या, असे आवाहन करून जनतेला साद घातली. तर अत्यंत कमी कालावधीत भाजपचे रमेश आडसकर यांनी लाखभर मते पदरी पाडून ही निवडणूक चुरशीची केली.
वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत धम्मानंद साळवे यांनी तिसरे स्थान मिळवले. त्यांना ५ हजार ५ मते मिळाली.
विजयाची तीन कारणे...
प्रकाश सोळंके यांच्या विरोधात उभा असलेले भाजपचे उमेदवार रमेश आडसकर हे स्थानिक उमेदवार नसल्याची मतदारसंघात चर्चा होती. याचा फायदा सोळंकेंना झाला.
मागील निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर सोळंके यांनी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क वाढवला होता. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले होते.
भाजपमधील अंतर्गत राजकारण देखील प्रकाश सोळंकेंच्या विजयासाठी सहाय्यकारी ठरले.