सोन्यासारखी लेकरं गेली हो! उसतोड मजुरांच्या ४ मुलांचा नदीतील खड्ड्यात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2022 02:28 PM2022-02-08T14:28:13+5:302022-02-08T14:29:07+5:30
मुलांचे आई-वडील ऊसतोडीसाठी स्थलांतरित झाले होते. मुलांना शिक्षणासाठी जवळच्या नातेवाइकांकडे ठेवले होते.
गेवराई(जि.बीड) : लेकराला गावात ठेवून चूक झाली... सोबत नेली असती तर वाचली असती... सोन्यासारखी लेकरं गेली हो.... अशा शब्दांत शोकमग्न कुटुंबीयांनी टाहो फोडला.
तालुक्यातील शहाजानपूर चकला येथे अवैध वाळू उपशामुळे नदीपात्रात झालेल्या खड्ड्यात बुडून चार मुलांचा ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी दुर्दैव अंत झाला. बीड व गेवराईच्या पोलीस, महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक शवविच्छेदनास तयार झाले. सोमवारी, दि. ७ रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, २४ तास उलटूनही गुन्हा दाखल झालेला नाही. गणेश बाबू इनकर (८), आकाश राम सोनवणे (१०), बबलू गुणाजी वक्ते (११, सर्व रा. शहाजानपूर चकला) व अमोल संजय कोळेकर (रा. तांदळवाडी, ता. बीड) या शाळकरी मुलांचा शहाजानपूर चकला येथील सिंदफणा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला.
अमोल कोळेकर यास तांदळवाडीला सोडण्यासाठी नदीपात्र ओलांडताना चौघेही बुडाले. नदीपात्रात माफियांनी बेसुमार वाळू उपसा केल्याने जागोजागी खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यानेच मुलांचा बळी घेतल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. रात्री नऊ वाजता मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. ठोस कारवाई झाल्याशिवाय मृतदेह जागचे हलू देणार नाहीत, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला होता. संताप व रोष व्यक्त करत गावकरी आक्रमक झाल्यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण होते.
गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे, बीडचे तहसीलदार सुरेंद्र डोके, गेवराईचे उपअधीक्षक स्वप्निल राठोड, बीडचे उपअधीक्षक संतोष वाळके, गेवराई ठाण्याचे सहायक पाेलीस निरीक्षक संदीप काळे, बीड ग्रामीण ठाण्याचे सहायक पाेलीस निरीक्षक योगेश उबाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अवैध वाळू रोखण्यासाठी ठोस कारवाई करून माफियांना लगाम लावू, या घटनेची पुनरावृत्ती टाळू, असे लेखी आश्वासन दिल्यावर पहाटे दोन वाजता मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवले. सोमवारी, दि. ७ रोजी सकाळी उत्तरीय तपासणीनंतर ते नातेवाइकांच्या स्वाधीन केले. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आई-वडील गेले होते ऊसतोडीला
दरम्यान, मयत मुलांचे आई-वडील ऊसतोडीसाठी स्थलांतरित झाले होते. मुलांना शिक्षणासाठी जवळच्या नातेवाइकांकडे ठेवले होते. मात्र, त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या पालकांना निरोप धाडल्यावर ते तातडीने गावी पोहोचले. मुलांचे मृतदेह पाहून त्यांनी आक्रोश केला, त्यामुळे उपस्थितांनाही गहिवरून आले.