विमा कंपनीवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 12:06 AM2020-02-01T00:06:10+5:302020-02-01T00:06:47+5:30
बीड : रबी २०१९ या हंगामात पीकविमा काढलेल्या १ लाख ७९ हजार शेतकऱ्यांचे विमा दावे अद्याप अस्पष्ट आहेत. करारानुसार ...
बीड : रबी २०१९ या हंगामात पीकविमा काढलेल्या १ लाख ७९ हजार शेतकऱ्यांचे विमा दावे अद्याप अस्पष्ट आहेत. करारानुसार विलंब करुन संशयास्पद वातावरण निर्माण केल्याने कृषी विभागाच्या वतीने तक्रार देण्यात येणार असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानंतर गुन्हा दाखल होणार आहे.
या हंगामात ९ लाख ४१ हजार ८३३ शेतक-यांनी विमा काढला होता. त्यापैकी १ लाख ७९ हजार शेतक-यांचा विमा दावा एक महिन्यात निकाली काढणे आवश्यक होते. मात्र, जवळपास एक वर्ष होऊनही या प्रकरणी कंपनी बजाज अलियान्झ कडून कुठलीही माहिती देण्यात येत नव्हती. रबी हंगामातील पीकविमा मिळावा म्हणून दावेदार शेतकºयांनी बीडसह पुणे येथे आंदोलने केली. तर तालुका व जिल्हा बैठकीत कंपनीच्या वतीने कुठलीही माहिती देण्यात येत नव्हती.
अनेकदा जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कंपनीचे जबाबदार अधिकारी उपस्थित नसायचे. त्यामुळे कृषी विभागासोबत केलेल्या कराराचा भंग, विलंब व्याजासह विमा दावे निकाली न काढणे, माहिती न देणे आदी संशयामुळे अतिरिक्त कृषी उप संचालक दिलीप जाधव हे शुक्रवारी शिवाजीनगर ठाण्यात तक्रार नोंदविण्यास गेले होते. यावर लवकरच निर्णय होणार आहे.
दरम्यान, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही विमा कंपनीविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.