चढ्या दराने खतांची विक्री होण्याची शक्यता ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:33 AM2021-04-18T04:33:41+5:302021-04-18T04:33:41+5:30
बीड : खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. मागील वर्षीप्रमाणे काही ठिकाणी खतांची कृत्रिम टंचाई ...
बीड : खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. मागील वर्षीप्रमाणे काही ठिकाणी खतांची कृत्रिम टंचाई करून जादा दराने खतांची विक्री केल्याचे समोर आले होते. यंदा खतांचा तुटवडा भासू नये यासाठी बीड कृषी विभागाकडून आवश्यकतेनुसार खताची मागणी करण्यात आली आहे. शासनाने ठरविलेल्या किमतीप्रमाणेच शेतकऱ्यांनी खताची खरेदी करावी व पक्की पावती घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
कृषी सेवा केंद्रांकडून कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी विक्रेत्यांवर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच कृषी विभागाच्या गुण नियंत्रण विभागाच्या वतीने वेळोवेळी तपासण्यादेखील केल्या जाणार आहेत. बोगस बियाण्यांप्रमाणे खतामध्ये देखील काळाबाजार होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे कृषी विभाग सतर्क असून, शेतकऱ्यांनी देखील सजग राहून खतांची व बियाणांची खरेदी करून फसवणूक व आर्थिक नुकसान टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खताच्या किमती कंपनीकडून निर्धारित करण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्याची किंमत कमी करण्याचा शासनाचा विचार असल्याची सूत्रांची महिती आहे. त्यामुळे शासनाकडून ठरलेल्या किमतीप्रमाणेच शेतकऱ्यांनी खतांची खरेदी करावी व पक्की पावती घ्यावे, असे आवाहन कृषी विभाग बीड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
खत विक्रेत्यांनी ई-पॉस मशीन बंधनकारक
जिल्ह्यातील सर्व परवानाधारक खत विक्रेत्यांना ई-पॉस मशीनद्वरे किंवा डेस्कटॉप प्रणालीचा वापर करणे
बंधनकारक असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अनुदानित खत विक्री करणे तसेच पक्की पावती देऊन एमआरपीप्रमाणे विक्री करणेदेखील बंधनकारक असणार आहे. दरम्यान, विक्री केंद्रासमोर खताचा साठा फलक व भावफलक लावून त्यामध्ये आवश्यकतेनुसार बदलदेखील करावे लागणार आहेत. शेतकऱ्यांना फसविण्याच्या दृष्टीने खत विक्रेत्यांनी कार्यवाही केली तर सबंधितांवर खत नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्याचे संकेत जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी बीड एस. डी. गरंडे यांनी दिले आहेत.
रासायनिक खतांचा संतुलित वापर करा
रासायनिक खतांचा शेतकऱ्यांनी भरमसाट वापर न करता संतुलित वापर करावा. तसेच रासायनिक खतांसोबत लिंबोळी पेंड व इतर जैविक खतांचा वापर केल्यास पिकांना चांगला फायदा होऊ शकतो.
प्रतिक्रिया
खत खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या काही तक्रारी असतील तर संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे तक्रार करावी त्यासंदर्भात चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.
दत्तात्रय मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड
खतांचा सरासरी वापर १ लाख ५१ हजार मेट्रिक टन
कृषी विभागाने केलेली मागणी २ लाख ७७ हजार मेट्रिक टन
शासनाने मंजूर केलेले आवंटन २ लाख १ हजार मेट्रिक टन
१६ एप्रिल २०२१ रोजीचा साठा ६८ हजार मेट्रिक टन
===Photopath===
170421\17_2_bed_25_17042021_14.jpg
===Caption===
खत पेरताना शेतकरी