माझं नेतृत्व विकसित करण्यात साहित्यीकांचा मोठा वाटा - रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 06:56 PM2022-06-08T18:56:07+5:302022-06-08T18:56:24+5:30
महाराष्ट्रात सध्या जी राजकिय स्थिती आहे. ती बदलली पाहिजे.
अंबाजोगाई-: - दलित पँथरची चळवळ उभी राहिल्यास, या चळवळीला साहित्यीकांनी पाठबळ व नवी दिशा दिली. याच चळवळीत प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांचेही माझ्या जडण-घडणीत महत्वपुर्ण योगदान आहे, असे प्रतिपादन केंद्रिय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले.
अंबाजोगाईत प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांच्या सेवानिवृत्ती प्रित्यर्थ आयोजित नागरी सत्कार समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून रामदास आठवले बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजेागाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी होते. तर व्यासपीठावर आ.विक्रम काळे, माजी कुलगुरू मधुकरराव गायकवाड, रिपाईचे युवक प्रदेशध्यक्ष पप्पु कागदे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सिद्धार्थ भालेराव, भाजपाचे प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी, डॉ.नरेंद्र काळे, प्रा.सुशिला मोराळे, रामचंद्र तिरूके, सत्कार मुर्ती प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे , सौ.विद्या कमलाकर कांबळे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक सहिष्णुता व सामाजिक समानतेचा मुलमंत्र दिला. याच धर्तीवर राजकारण्यांनी नितीमत्तेवर आधारित राजकारण केले पाहिजे. महाराष्ट्रात सध्या जी राजकिय स्थिती आहे. ती बदलली पाहिजे. सर्व जाती धर्म एकत्रित येवून मानवता धर्म जोपासण्यासाठी पुढाकार घेतील, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली.
प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे हे दलित पँथरच्या चळवळीपासुन माझे सहकारी असून, शिक्षण क्षेत्रातही सामान्य विद्यार्थ्यांना त्यांनी न्याय दिला. अनेक विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख दिली. एका विशिष्ट विचाराच्या शिक्षण संस्थेतही ते १९ वर्षे प्राचार्य राहिले. ही गौरवाची बाब आहे. विद्यार्थ्यांना अन्यायाविरूद्ध उभे करून शिक्षण हाच प्रगतीचा महामार्ग आहे. ही डॉ.बाबासाहेबांची शिकवण आचरणात आणल्यानेच ते विद्यार्थी प्रिय शिक्षक ठरले. आता सेवानिवृत्तीनंतर प्राचार्य कांबळे हे आमच्या सोबत कार्यरत राहतील. त्यांचा सन्मान ठेवत त्यांच्यावर रिपाईच्या वतीने मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.
यावेळी आपल्या सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे म्हणाले की, ३६ वर्षे अध्यापनाचे काम करत असताना १९ वर्षे, प्राचार्य म्हणून संस्थेने माझ्यावर जबाबदारी दिली. त्या जबाबदारीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना न्याय देता आला. प्रामाणिकपणे काम केल्यास समाज प्रेम करतोच. याची प्रचिती आली. आगामी काळात अंबाजोगाईची मान उंचावेल असेच काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य कांबळे यांनी आपल्या भाषणात अंबाजोगाईत मराठी भाषेचे विद्यापीठ व्हावे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा., अंबाजोगाई-लातूर व घाटनांदुर-अंबाजोगाई हा रेल्वे मार्ग अस्त्त्विात यावा. अशी मागणी केंद्रीय मंत्र्यांकडे केली.
यावेळी आपल्या अध्यक्षीय समारोपात बोलताना राजकिशोर मोदी म्हणाले की, प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांचे शैक्षणिक क्षेत्रासोबतच साहित्यीक व सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. अंबाजोगाई व परिसरात प्राचार्य कांबळे यांनी उभा केलेल्या सामाजिक चळवळीमुळे अनेकांच्या जीवनात परिवर्तन निर्माण झाले. अनेक गरिब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. प्राचार्य कांबळे सेवानिवृत्त झाले असले तरी आता सामाजिक चळवळ पुढे नेण्यासाठी ते आग्रेसर राहतील. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी आ.विक्रम काळे, माजी कुलगुरू मधुकरराव गायकवाड, पप्पु कागदे, राम कुलकर्णी, प्रा.स्नेहल पाटक, शंकर वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे व सौ.विद्या कमलाकर कांबळे यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
दिप्रपज्वलन व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्कार समितीचे अॅड.सुनिल सौंदरमल यांनी केले. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत प्रा.डी.जी.धाकडे, डॉ.राहुल धाकडे, मुजीब काझी, विनोद पोखरकर, अविनाश मुडेगावकर, दगडु लोमटे यांनी केले. या कार्यक्रमाचे संचलन प्रा.मेघराज पवळे यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा.डी.जी.धाकडे यांनी मानले. या कार्यक्रमास शिक्षण प्रेमी महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
अंबाजोगाई-लातूर रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा करू
अंबाजोगाई ते घाटनांदुर हा रेल्वे मार्ग नव्याने अस्तित्वात यावा. यासाठी आपण केंद्रिय रेल्वे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत. या रेल्वे मार्गाच्या सर्व्हेसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच अंबाजोगाई येथे अद्यकवी मुकुंदराज स्वामी यांच्याच भूमित मराठी भाषेचे विद्यापीठ व्हावे. यासाठी केंद्र सरकारकडून लागणारी मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले.