सत्त्व असलेल्यांचे साहित्य दर्जेदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 03:58 AM2017-12-25T03:58:11+5:302017-12-25T03:58:11+5:30
आत्मविद्या म्हणजे स्वत:स जाणणे आणि साहित्य म्हणजे केवळ शब्दांचा खेळ नाही. शब्दच्छल म्हणजे भाषेचा दुरूपयोग, उपमर्द, म्हणून खरे साहित्यिक त्या मार्गाने जात नाहीत
सतीश जोशी
अंबाजोगाई (जि. बीड) : आत्मविद्या म्हणजे स्वत:स जाणणे आणि साहित्य म्हणजे केवळ शब्दांचा खेळ नाही. शब्दच्छल म्हणजे भाषेचा दुरूपयोग, उपमर्द, म्हणून खरे साहित्यिक त्या मार्गाने जात नाहीत. ज्यांच्याकडे सत्त्व आहे, त्यांचे साहित्य दर्जेदार; परंतु अपवाद सोडला, तर दर्जेदार साहित्य निर्मिती होत नाही, अशी खंत मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी यांनी व्यक्त केली.
अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयात रविवारी मराठवाडा साहित्य संमेलनास प्रारंभ झाला. गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे माझे विद्यार्थी. राज्यात असो की केंद्रात, त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप टाकली, असे तिवारी यांनी सांगितले.
पुरस्कारासाठी स्वाभिमान विसरून साहित्यिक लीन होताना दिसत आहेत आणि दर्जा नसलेल्या साहित्यास पुरस्कार मिळावा म्हणून राजकारण्यांच्या समोर रांगेत तिष्ठत बसतात, हे चित्र शोचनीय आहे. आम्ही मास्तर होतो; पण कर्तव्यापासून दूर राहिलो नाहीत, कुणापुढे मान तुकवली नाही, लाचार झालो नाहीत. गुणवत्ता असूनही नोकºया मिळत नाहीत, पैसे मागितले जातात. नाइलाजाने देणारेही देतात आणि घेणारेही निर्लज्जपणे घेतात, ही शोकांतिका आहे. वंचितांच्या मदतीला कुठलाही विठ्ठल धावून येत नाही. जगावे कसे, असा प्रश्न निर्माण होतो. व्यभिचार करणारे राजकारणी वाढत आहेत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
उद्घाटनाच्या सत्रात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे, सुरेश धस, खा. रजनी पाटील यांनी भाषणात साहित्य व संस्कृती या विषयाचा धागा जपला.