साहित्यामध्ये जात-पात, धर्माचे रंग नसावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:31 AM2018-01-22T00:31:51+5:302018-01-22T00:33:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जात-पात, धर्माचे रंग आल्यामुळे राजकारण बदनाम झाले. परंतु साहित्य क्षेत्रातही हे रंग पाहावयास मिळतात, ही दुर्दैवी बाब होय. जिथे साहित्यातून विचार दिला जातो, तिथे तरी जाती-धर्माच्या भिंती नसाव्यात, असे प्रतिपादन ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी केले.
दोन दिवस चाललेल्या या संमेलनाचा समारोप रविवारी सायंकाळी येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडला. अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्षा प्राचार्या डॉ. दीपा क्षीरसागर तर पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, कौतिकराव ठाले, सुशीला मोराळे, नामदेवराव क्षीरसागर, कवयित्री संजीवनी तडेगावकर, भास्कर बडे, डॉ. ऋषिकेश कांबळे, रमेश पोकळे, संतोष हंगे आदी उपस्थित होते.
साहित्य आणि राजकारणातील वाद हा नेहमीच चालत आला आहे. अतिथींची यादी पाहता या संमेलनावरही राजकीय प्रभाव होता. या प्रसंगी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, अनेक वर्षांपासून स्त्री - पुरुष भेदावर चर्चा चालूच आहे. स्त्री मुक्ती, समानता, स्वातंत्र्य यावर बोलले जाते. अनेक महाकाव्यातील कथेचे दाखले दिले जातात. परंतु या महाकाव्यातून बोध दिला जातो तो महत्त्वाचा आहे. स्त्री आणि पुरुषांनी एकमेकांचा सन्मान राखला तर आपोआपच सर्व प्रश्न सुटतील. त्याची सुरुवात आपण आपल्या कुटुंबापासून केली पाहिजे.
आपल्यापेक्षा कमी शक्ती असलेल्या स्त्रीला जर प्रत्येकीने शक्ती दिली पाहिजे. स्त्रीचा सन्मान राखत त्यांना मुख्य प्रवाहात बरोबरीने आणने गरजेचे आहे. उद्घाटन समारंभात सुप्रिया सुळे यांनी शासनाच्या ध्येयधोरणावर अप्रत्यक्ष टीका केली होती. शाळा बंद करण्याचा निर्णय हाणून पाडू, असे ठणकावले आणि दुसºया दिवशी संमेलनात मराठी शाळा बंद करू नये, असा ठराव घेतला. हा धागा पकडून त्यांनी साहित्यात येत असलेल्या राजकारणाचा सडेतोड समाचार घेतांना ‘वस्तुस्थिती’ जाणून घेतली पाहिजे असा सल्ला दिला.
पटसंख्या कमी असलेल्या शाळाही बंद करु नयेत असा ठराव या संमेलनात घेतला. याबद्दल बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, शाळांच्या संदर्भात चुकीचे गैरसमज पसरविले जात आहेत. वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. ज्या ठिकाणी पटसंख्या कमी आहे आणि दुसरी शाळा एक किलोमीटरच्या आत नाही अशा ठिकाणच्या शाळा शासनाने बंद केलेल्या नाहीत.
अनाथ मुलांसाठी नोकरीत एक टक्का आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या चांगल्या निर्णयाच्या अभिनंदनाचा ठराव या संमेलनामध्ये होईल, असे मला वाटले होते. परंतु तसे घडले नाही. हे सांगताना त्यांनी साहित्य क्षेत्रातही कसे राजकारण शिरले आहे, हे अप्रत्यक्षरीत्या उपस्थितांच्या लक्षात आणून दिले.