भर उन्हाळ्यात अनियंत्रित लोडशेडिंग; भाजपने काढली पंख्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 04:16 PM2022-04-12T16:16:44+5:302022-04-12T16:17:04+5:30
थर्मल पॉवर स्टेशन येथे असल्याने परळी शहर ऊर्जानगरी म्हणून ओळखल्या जाते. येथेच लोडशेडिंग सुरु आहे
परळी (बीड): वाढत्या वीज भारनियमनामुळे परळीकर त्रस्त झाले आहेत, ऊर्जा नगरी असलेल्या परळीत भाजयुमो, भारतीय जनता पक्षातर्फे पंख्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात काढून महावितरण विरोधात आज दुपारी आंदोलन करण्यात आले.
थर्मल पॉवर स्टेशन येथे असल्याने परळी शहर ऊर्जानगरी म्हणून ओळखल्या जाते. यामुळे शहरात लोडशेडिंग होणार नाही असा निर्णय पूर्वीच्या शासनाने घेतला होता. मात्र, भर उन्हाळ्यात परळीत दिवसभरात केव्हाही लाईट जाते. कडक उन्हाळा असल्याने वयोवृद्ध, लहान मुले उन्हाने त्रस्त आहेत. आधीच पिण्याचे पाणी तब्बल पाच दिवसाला येत आहे त्यात. लाईट नसल्यास पाणीही मिळत नाही. लाईट जाण्याचे कुठलेही ठरलेले वेळापत्रक नसल्यामुळे शहरात सध्या गोंधळ उडाला असल्याचे आंदोलकांनी म्हटले.
अनियंत्रित लोडशेडिंग विरोधात भाजयुमो, भारतीय जनता पक्षातर्फे पंख्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून आंदोलन करण्यात आले. लवकरच यावर तोडगा काढला नाही तर यापुढे भाजपातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजयुमो, भारतीय जनता पक्षातर्फे देण्यात आला. आंदोलनात नगरसेवक प्रा. पवन मुंडे,अश्विन मोगरकर, मोहन जोशी, अरुण पाठक, नितीन समशेट्टी, सचिन गीते, योगेश पांडकर, प्रशांत कराड, राहुल केंद्रे, गोविंद चौरे, धनराज कुरील, श्रीनिवास राऊत, नरेश पिंपळे यांच्यासह इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.