लाल दिव्यासाठी ‘लॉबिंग’ !
By Admin | Published: February 25, 2017 12:28 AM2017-02-25T00:28:38+5:302017-02-25T00:29:17+5:30
बीड बहुमताअभावी जिल्हापरिषदेत निर्माण झालेला सत्तास्थापनेचा पेचप्रसंग कसा सुटतो हे पाहणे मोठे रोमांचक ठरणार आहे.
प्रताप नलावडे बीड
बहुमताअभावी जिल्हापरिषदेत निर्माण झालेला सत्तास्थापनेचा पेचप्रसंग कसा सुटतो हे पाहणे मोठे रोमांचक ठरणार आहे. तूर्त लाल दिव्यासाठी इच्छुकांनी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे. राकाँतर्फे माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या पत्नी मंगल सोळंके, सारिका सोनवणे व काँग्रेसच्या आशा दौंड या तिघींची नावे पुढे येत आहेत.
सर्वाधिक २५ सदस्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्या पाठोपाठ १९ सदस्यांसह भाजपचा क्रमांक लागतो. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना धोबीपछाड दिल्यानंतर जिल्हा परिषद राकाँच्याच ताब्यात अबाधित ठेवण्याचे आव्हान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यापुढे आहे. अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्यामुळे अनेकांना लाल दिव्याचे वेध लागले आहेत.
जिल्हापरिषदेच्या राजकारणात अग्रेसर असलेल्या राष्ट्रवादीमध्ये गट तितके नेते आहेत. सध्या सर्वाधिक सदस्य धनंजय मुंडे गटाकडे आहेत. परळी तालुक्यातील ६, अंबाजोगाई तालुक्यातील ४ व केज तालुक्यातील २ असे एकूण डझनभर सदस्य धनंजय मुंडे गटाचे मानले जातात. ज्याच्याकडे सर्वाधिक सदस्य तो अध्यक्ष हा राकाँचा जुनाच अलिखित नियम. त्यामुळे धनंजय मुंडे ठरवतील तो अध्यक्ष पदाच्या खुर्चीत असेल असे संकेत आहेत. तसे झाले तर धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय सारिका बजरंग सोनवणे यांची वर्णी लागू शकते. काँग्रेसने परळी तालुक्यात राष्ट्रवादीशी आघाडी केली. याबदल्यात याआधी उपाध्यक्षपद भूषविलेल्या काँग्रेसच्या आशा संजय दौंड यांचे देखील अध्यक्षपदी ‘प्रमोशन’ होऊ शकते.
दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीतील पराभवापासून राजकीय विजनवासात असलेले माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या पत्नी मंगल सोळंके या देखील अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार मानल्या जातात. सोळंके हे अजित पवारांचे खंदे समर्थक असून, त्यांनी माजलगावात सर्वच्या सर्व ७ जागांवर राकाँला विजय प्राप्त करून दिला आहे. शिवाय, वडवणी - धारूर तालुक्यात त्यांचा प्रभाव आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नीला लाल दिव्याची लॉटरी लागू शकते.
इकडे अल्पमतात असलेल्या भाजपनेही सत्तास्थापनेसाठीचा ३१ हा जादुई आकडा गाठण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. रणांगणातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपने रणनीती आखणे सुरू केले आहे.