लॉकडाऊमुळे दुसऱ्या दिवशीही व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:31 AM2021-03-28T04:31:59+5:302021-03-28T04:31:59+5:30
बीड : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी २६ मार्चपासून १० दिवसांचा लॉकडाऊन जारी केला. ...
बीड : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी २६ मार्चपासून १० दिवसांचा लॉकडाऊन जारी केला. लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशीही जिल्हाभरात सर्वच व्यवहार ठप्प होते. सवलतीच्या वेळेत आपली दुकाने बंद ठेवत व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या निर्णयावर नाराजी दर्शविली.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले, तर कोरोनाबाधितांची संख्याही वाढत गेली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दहा दिवसांचा लाॅकडाऊन घोषित केला. लॉकडाऊन काळात रोज सकाळी ७ ते ९ यावेळेत होलसेल व किरकाेळ किराणा दुकानांसाठी शिथिलता देण्यात आली. परंतु ही वेळ गैरसोयीची असल्याने जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी निर्णयाला विरोध दर्शवित बेमुदत व्यापार बंदचा निर्णय घेतला. २६ मार्च व २७ मार्च रोजी शिथिल वेळेतही किराणा दुकाने उघडली नाही, त्यामुळे अनेक ग्राहकांची गैरसोय झाली.
जिल्ह्यातील सर्वच शहरे आणि गावांमध्ये शुकशुकाट होता. औषध दुकाने, दवाखाने, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते.