Lockdown : लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी जनता घरात, पोलीस रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 05:14 PM2020-08-13T17:14:12+5:302020-08-13T17:19:43+5:30
बीड, माजलगाव, आष्टी, केज, परळी, अंबाजोगाईत कडकडीत बंद
बीड : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सुरु असलेल्या उपाय योजनेंतर्गत १२ ते २१ आॅगस्टदरम्यान जिल्ह्यातील प्रमुख सहा शहरांमध्ये लॉकडाऊनचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार बीड, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, आष्टी आणि केजमध्ये बुधवारी पहिल्या दिवशी नागरिक घरात आणि पोलीस रस्त्यावर असे चित्र पहायला मिळाले.
मंगळवारी रात्री ११ वाजेपासून पोलिसांनी ध्वनीक्षेपकाद्वारे संचारबंदीबाबत नागरिकांना कल्पना दिली. रात्रभर पेट्रोलिंग सुरु होती. सकाळी ७ ते ९ यावेळेत दूध विक्रेत्यांना घरपोच दूध वितरणासाठी सवलत दिली होती. तर रुग्णालयांशी संलग्न औषधी दुकाने सुरु ठेवण्यास मुभा होती. शहरातील शिवाजी चौक, बार्शी नाका, जालना रोड, नगर रोड, पेठ भागात येणाऱ्या जाणाऱ्या वाहन धारकांची तसेच नागरिकांची पोलीस चौकशी करीत होते. दिवसभर रस्ते निर्मनुष्य होते. परळी शहरात बुधवारी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी सर्व बाजारपेठ कडककडीत बंद होता. शहरात वाहनांची वाहतूकही नव्हती, विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी आळा घातला. शहर व संभाजीनगर पोलिसानी गस्त घालून कडक बंदोबस्त ठेवला.
आष्टीकरांचाही प्रतिसाद
आष्टी : प्रशासनाच्या आदेश आणि आवाहनाला साथ देत शहरातील नागरिकांसह व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ५ पोलिस अधिकारी, ५० पोलिस,२० होमगार्ड तैनात केले होते. नेहमी गजबजणाऱ्या चौकात शकुशुकाट होता तर बाजारपेठ बंद होती. नागरिकांनी महत्त्वाचे काम असेल तरच बाहेर पडावे. विनाकारण फिरताना दिसल्यास कारवाई केली जाईल. नागरिकांनी १० दिवस घराच्या बाहेर न पडता प्रशासनास सहकार्य केले तरच कोरोनाला आष्टीतून हद्दपार करु शकतो, असे आवाहन पो. नि. बाळासाहेब बडे यांनी केले.
माजलगाव दंगल नियंत्रण पथक तैनात
माजलगाव : शहरात बुधवारी सकाळ पासूनच प्रमुख रस्त्यांवर दंगल नियंत्रण पथकाचे जवान तैनात केल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता. शिवाजी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,मौलाना आझाद चौक,संभाजी चौकात पोलीस तैनात होते. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाची व वाहनांची कसून चौकशी करत होते. कारण नसताना फिरणाऱ्यांना लाठ्यांचा प्रसाद मिळत असल्याने नागरिकही रस्त्यावर येण्याचे टाळत होते. नागरिकांनी नियम पाळून कोरोनाची वाढत चालली साखळी तोडण्याचे आवाहन पोलीस निरीक्षण सुरेश बुधवंत यांनी केले.
परळीत सीसीसीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
परळी शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या कोविड सेंटरला बुधवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी भेट दिली व पहाणी केली. यावेळी परळीचे तहसीलदार विपीन पाटील, गटविकास अधिकारी संजय केंद्रे, नायब तहसीलदार बाबूराव रुपनर, परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. अरुण गुट्टे, वैद्यकीय अधिकारी डॉ दिनेश कुरमे, कोवीड केअर सेंटरचे प्रमुख डॉ अर्शद शेख, पोनि.बाळासाहेब पवार, पोनि हेमंत कदम, नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे आदींची उपस्थिती होती.
अंबाजोगाईत अंमलबजावणीसाठी महसूल प्रशासन रस्त्यावर
अंबाजोगाई शहर आणि लगतचे जोगाईवाडी, शेपवाडी, चनई आणि मोरेवाडी या गावांमध्येही लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. या सर्व ठिकाणी लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीसाठी तालुका महसूल प्रशासनाने कंबर कसली असून सर्व दहा दिवस प्रशासन रस्त्यावर उतरणार आहे.लॉकडाऊन आदेशाचे कडक पालन व्हावे यासाठी शहरातील प्रत्येक चौकात आणि रस्त्यावर खडा पहारा ठेवण्यासाठी महसूलच्या अधिकारी आणि कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी १७ पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात एक पथक प्रमुख आणि दोन सहायक असणार आहेत. ही पथके दहा दिवस शहरातील १७ चौकात सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाळत ठेवणार आहेत.