Lockdown : बीड जिल्ह्यातील सहा शहरे दहा दिवस राहणार ‘लॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 12:50 PM2020-08-11T12:50:09+5:302020-08-11T12:57:20+5:30
कोरोना नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचा निर्णय
बीड : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता बीडसह अंबाजोगाई, परळी, माजलगाव, आष्टी, केज हे शहरे १२ ते २१ आॅगस्ट असे १० दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना इतर सेवा व बाहेर येण्यास प्रतिबंध असणार आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी रविवारी हे आदेश काढले आहेत.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात रोज १०० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे धोका वाढत चालला आहे. बीड व गेवराई शहरात व्यापारी, दुकानदार, फळ व दुध विक्रेत्यांच्या अँटिजन तपासणी करण्यात आल्या. बीडमध्ये तर दोन दिवसांत १०० पेक्षा जास्त व्यापाऱ्यांना बाधा झाल्याचे उघड झाले आहे. यावरून समूह संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. आता याला नियंत्रणात आणण्यासाठी १० दिवसांचे लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रेखावार यांनी रविवारी घेतला आहे. त्याप्रमाणे बीडसह अंबाजोगाई, परळी, आष्टी, माजलगाव व केज या शहरांत सार्वाधिक रुग्ण असल्याने १० दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. १२ आॅगस्टच्या रात्रीपासून ते २१ आॅगस्टच्या रात्रीपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व शासकीय कार्यालये, सेवा, वाहतूक, नागरिकांना बाहेर येण्यास बंदी असणार आहे. नागरिकांनी घरातच राहून सहकार्य करण्याचे आवाहनही प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
लक्षणे नसणाऱ्यांचे घरीच विलगीकरण
ज्या कोरोनाबाधित रुग्णांना कोणतेही लक्षणे नसतील तर त्यांची पूर्ण वैद्यकीय तपासणी करुन आणि त्यांच्या घरीच विलगीकरणाची व्यवस्था समाधानकारक होऊ शकेल याची खात्री केल्यानंतर त्यांना घरीच विलगीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. परंतु, त्यांनी या विषयीचे लेखी पत्र सादर करणे आणि पल्स ऑक्सीमिटर विकत घेऊन दर तासाला स्वत:चे व दुसऱ्या पल्स ऑक्सीमिटरने संपूर्ण परिवाराचे रक्तातील ऑक्सीजनचे प्रमाण तपासत राहणे बंधनकारक असेल, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात आहे.
या सेवा राहणार सुरू
- सकाळी ७ ते ९ यावेळेत घरपोहच दुध विक्री
- खासगी व शासकीय रुग्णालय आणि केवळ रुग्णालयांशी सलग्न औषधी दुकाने सुरु राहतील.
- प्रसारमाध्यमे सुरु राहणार.
- घरगुती गॅस सिलेंडर सेवा सुरु राहील. एजन्सीधारकांनी गणवेश परिधान करावा व ओळखपत्र बाळगावे.
- जार वॉटर सप्लायर्स यांनी ग्राहकांकडील उपलब्ध भांड्यात अनुषंगाने सामाजिक अंतराचे पालन करुन पाणी द्यावे. सर्व जार वाटर सप्लायर्स कर्मचाऱ्यांनी नियमानुसार पास काढून घेवून सेवा पुरवावी.
- मोबाईल कंपनी ऑपरेटर्सने नियमानुसार पास काढून सेवा पुरवावी.
या सेवा राहणार बंद
या पाच शहरांमध्ये इतर सर्व सेवा, फळे भाज्या इ. दुकाने, इतर सर्व दुकाने, खासगी आस्थापना, बँक पेट्रोलपंप, किराणा दुकाने (होलसेलसह) कृषी विषयक सर्व दुकाने (होलसेलसह) शासकीय कार्यालये (महसूल, पोलीस, आरोग्य, ग्रामविकास, नगरविकास, विद्युत वगळून) बंद राहतील.