मुख्याध्यापकाच्या कार्यालयास कुलूप ठोकले; तिघांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 12:11 AM2019-02-19T00:11:19+5:302019-02-19T00:11:44+5:30
मुख्याध्यापकाच्या कार्यालयास अधिकार नसताना कुलूप लावले, तसेच त्यावर नोटीसही चिटकवली. ही घटना २२ जानेवारी रोजी परळी शहरातील गणेशपार भागातील वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयात घडली.
बीड : मुख्याध्यापकाच्या कार्यालयास अधिकार नसताना कुलूप लावले, तसेच त्यावर नोटीसही चिटकवली. ही घटना २२ जानेवारी रोजी परळी शहरातील गणेशपार भागातील वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयात घडली. याप्रकरणी तिघांविरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयात नंदकिशोर पापालाल मोदी हे मुख्याध्यापक आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना लाच घेताना एसीबीने पकडले होते. याच संधीचा फायदा घेत परळीतील संजय सुशील देशमुख, सुवर्णा हरीश देशमुख आणि रविंद्र सुशिल देशमुख हे शाळेत गेले. मोदी यांच्या कार्यालयास कुलूप लावले. त्यावर खोटी नोटीसह चिटकविली. तसेच ‘तुला निलंबीत केले आहे’ असे म्हणत मारण्याची धमकी दिली. २२ जानेवारीला ही घटना घडल्यानंतर परळी शहर पोलीस ठाण्यात मोदी यांनी अर्ज केला. देशमुख यांनी आपण संचालक असल्याचे सांगितले. पोलिसांनी धर्मादाय आयुक्ताला पत्र पाठवून खात्री केली असता ते संचालक नसल्याचे समोर आले. त्यानंतर १७ फेब्रुवारी रोजी मोदी यांच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अद्याप हे तिनही आरोपी फरार आहेत. या सर्व आरोपींना लवकरच अटक करू, असे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी सांगितले.