दीड लाखाचा ऐवज साबलखेडमधून लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:24 AM2018-12-31T00:24:14+5:302018-12-31T00:24:46+5:30
तालुक्यातील साबलखेड येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शेजारील घरांच्या बाहेरून कड्या लावत महादेव बाबासाहेब गाडे यांच्या घरी जबरी चोरी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : तालुक्यातील साबलखेड येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शेजारील घरांच्या बाहेरून कड्या लावत महादेव बाबासाहेब गाडे यांच्या घरी जबरी चोरी केली. यामध्ये दहा तोळे दागिने आणि रोख चार हजार रूपये असा १ लाख ४२ हजार रुपयांचे मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले. या चोरीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महादेव गाडे हे रात्री आपल्या घरात कुटूंबासह झोपले होते. मध्यरात्री चोरट्यांनी शेजारील घराच्या बाहेरून कड्या लावल्या. त्यानंतर दरवाजा तोडून चोरटे आत शिरले. घरातील सोन्याचे साखळी, गठंन, नेकलेस, कानातील झुबंर, सोन्याच्या ठुसी, साधे गंठन, बोरमाळ, लहान मुलाच्या हातातील सोन्याच्या बाळ्या, सोन्याची अंगठी व रोख चार हजार रूपये असा १ लाख ४२ हजार रूपयांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
सदरील घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यशवंत बारवकर, पो.उप.नि. सोहन धोत्रे, माळी आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर लगेच फिंगर प्रिंट पथकाला पाचारण करण्यात आले. याप्रकरणाची अंभोरा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.