Lok Sabha Election 2019 : क्षीरसागरांच्या बंडखोरीने बीड लोकसभेची लढत ठरतेय रंगतदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 03:53 PM2019-04-11T15:53:21+5:302019-04-11T15:57:31+5:30
बीड लोकसभा मतदारसंघात यावेळी अत्यंत लक्षवेधी लढत होत आहे.
- सतीश जोशी
बीड लोकसभा मतदारसंघात यावेळी अत्यंत लक्षवेधी लढत होत आहे. भाजपच्या विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्यातच प्रमुख लढत होत असली, तरी अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचे प्रा. विष्णू जाधव यांच्या उमेदवारीमुळे ही लढत कागदावर तरी तिरंगी झाली आहे. आंबेडकरांच्या रविवारच्या सभेची गर्दी लक्षवेधक होती. प्रा. जाधव हे चळवळीतील कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांना मिळणारी मते कोणाच्या मताची वजाबाकी करतात, यावर इथल्या लढतीचा निकाल अवलंबून असेल.
बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहीण-भावातील राजकीय वैर नवे नाही. उलट गेल्या काही वर्षांत त्यात कटुताच आली आहे. पंकजा यांच्या भगिनी डॉ. प्रीतम या नावालाच उमेदवार असून, त्यांची लढाई पंकजाच लढत आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्याबाबतीतही तेच. त्यांची लढाई धनंजय मुंडेच लढत आहेत. त्यामुळे पंकजाविरुद्ध धनंजय असेच या लढाईला स्वरूप आहे. मुंडे बहीण-भाऊ एकमेकांच्या विरुद्ध काय बोलतात, हे ऐकण्यासाठीच भाजप, राष्ट्रवादीच्या सभेला गर्दी होत आहे.
पाडव्याच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे बंधू नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी डॉ. प्रीतम मुंडेंना विजयी करण्याचे आवाहन करून उघडपणे बंडखोरी केली. आजवर त्यांची भाजपसोबत छुपी युती होतीच. आता ते उघडपणे समोर आले आहेत. क्षीरसागरांच्या पाठिंब्यामुळे प्रीतम यांची बाजू भक्कम झाली असून, क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी कमळ हातात घेतल्याने लढतीत चुरस निर्माण झाली आहे.
दुसरीकडे शिवसंग्रामचे आ. विनायक मेटे यांनी भाजपचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर केल्याने भाजपची चिंता वाढली आहे. मेटे समर्थक कोणाचा झेंडा हाती घेतात, यावरही बरेच काही अवलंबून आहे. मेटेंकडून दगफटका होऊ नये, म्हणून मेटेसमर्थक असलेल्या तीन जि. प. सदस्यांना फोडून त्यांना भाजपच्या प्रचारात गुंतविले आहे.
कळीचे मुद्दे
- भाजपसाठी अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे अपूर्ण काम, मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्याकडे थकलेले शेतकऱ्यांचे एफ.आर.पी. पेमेंट
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही स्थानिक प्रमुख नेत्यांची बीड जिल्हा सहकारी बँकेची कर्ज थकबाकी प्रकरणे प्रचारात निघत आहेत.
प्रमुख उमेदवार :
डॉ. प्रीतम मुंडे । भाजप
बजरंग सोनवणे। रा.काँ.
प्रा. विष्णू जाधव । वंचित बहुजन आघाडी
तडजोड हेच भावाचे राजकारण
आमच्या धनंजयभाऊने राष्ट्रवादीचे वाटोळे केले. १४च्या निवडणुकीत मुंडे साहेबांना पराभूत करण्यासाठी कंबर कसली होती, खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. ज्यांनी चुलत्याच्या पाठीत खंजीर खुपसला, ते कुणालाही सोडत नाहीत. ‘तडजोडी’ हीच माझ्या भावाच्या राजकारणाची स्टाईल आहे - डॉ. प्रीतम मुंडे, भाजपा
ऊसउत्पादकांची काळजी
माझ्या ‘येडेश्वरी’ने उसाला २,२०० रुपये भाव दिला. मग आपल्या भगिनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्याने केवळ १,४०० रुपयेच भाव का दिला? शेतकऱ्यांचे उर्वरित ३४ कोटी रुपये कुठे गेले? शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला ऊसउत्पादकांची काळजी आहे. भाजप उमेदवारास त्याचे देणे घेणे नाही.
- बजरंग सोनवणे, रा.काँ.