‘नेटकऱ्यां’चा ‘हायटेक’ प्रचार, अनेक उमेदवारांसाठी ठरतोय धोक्याची घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 07:23 PM2019-04-09T19:23:59+5:302019-04-09T19:26:22+5:30
सोशल मीडियातून बदनामीच्या पोस्ट होताहेत शेअर
बीड : सोशल मेडिया प्रभावी व सहज उपलब्ध झालेले माध्यम झाल्यामुळे निवडणुकीत उभे राहिलेल्या सर्व उमेदवरांचा प्रचार हा सोशल मीडिया साईटवरुन जोरात सुरु आहे. तसेच ज्यांना आपल्या मतदारसंघातील समस्या किंवा चांगल्या कामांचे कौतुक करायचे असेल ते देखील मुक्तपणे करता येत आहे. मात्र, कार्यकर्त्यांकडून किंवा त्यांच्या सोशल मीडिया सेलकडून प्रतिस्पर्धी उमेदवाराची बदनामी होईल अशा पोस्ट शेयर केल्या जात आहेत. त्यामुळे अनेक वेळा प्रचाराची पातळी ही खालावत असल्याचे दिसून येत आहे.
मात्र, तरी देखील सोशल मीडियाला सुद्धा आचारसंहितेचे नियम लागू आहेत आणि निवडणूक विभाग व इतर संबंधीत विभागांची सोशल मीडियावर करडी नजर आहे. चुकीच्या पोस्ट किंवा समाजात तेढ निर्माण होईल असा मजकूर दिसला तर तात्काळ कारवाई करण्यात येत आहे. पूर्वीच्या काळी एकमेकांशी थेट बोलून केलेला प्रचार अधिक प्रभावी ठरत असे, त्याला आपण ‘माऊथ टू माऊथ’ असे म्हणतो आणि या प्रचाराचा प्रभाव हा सभेपेक्षा सुद्धा जास्त प्रभावी ठरतो, असे तज्ज्ञ सांगतात. परंतु आजच्या व्यस्त जीवनामध्ये सोशल मीडियाचा वापर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रभावीपणे मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.
अगदी गाव, वाड्या वस्त्यांवरील तरुणांच्या हातात मोबाईल व इंटरनेट पोहचल्यामुळे ते त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. २०१४ साली देखील सोशल मीडियाचा वापर प्रचारासाठी करण्यात आला मात्र, त्यावेळी इंटरनेट सेवेचा विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला नव्हता, त्या तुलनेत २०१९ या वर्षात इंटरनेट यंत्रणेचा विस्तार झाला असून गावोगावी मोबाईलसेवा उपलब्ध झाली आहे.
पूर्वी प्रचाराची साधने हाताच्या बोटावर मोजण्याइतकी मर्यादित होती़ आता मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘नेटकरी’ कार्यकर्ते प्रचार पेरणी मोठ्या वेगाने करत आहेत़ त्यामुळे एकाचवेळी अनेकांपर्यंत पोहोचता येणे शक्य होते़ प्रचाराची ही ‘हायटेक’ यंत्रणा अधिक प्रभावी ठरत आहे़ मात्र, असे असले तरी जी हायटेक यंत्रणा प्रचारात उभी आहे ती जिल्ह्याच्या विकासात आली पाहिजे अशी सर्व नागरिकांची अपेक्षा आहे़
सोशल मीडियाचा गैरवापर वाढतोय
सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत, तेवढेच तोटे देखील असल्याचे पाहायला मिळत आहे. आणि या माध्यमातून एखाद्या उमेदवाराची बदनामी ही कमी वेळेत मोठ्या प्रमाणात होते. तसेच अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख लपवून फेक अकाऊंटवरुन पोस्ट व इतर मजकूर टाकून देखील प्रतिस्पर्ध्यांची बदनामी केली जाते, या कामासाठी अनेक राजकीय पक्षांनी मीडिया सेलची निर्मिती केली आहे.