Lok Sabha Election 2019 : बीडमध्ये पंकजा विरुद्ध धनंजय असाच सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 06:27 PM2019-04-02T18:27:01+5:302019-04-02T18:27:42+5:30

अजूनही क्षीरसागर बंधू शांतच; तर मुंडे भगिनींनी केली विनायक मेटेंची ‘शिवसंग्राम’ खिळखिळी

Lok Sabha Election 2019 : Its Pankaja Munde vs Dhananjay Munde in Beed Lok Sabha | Lok Sabha Election 2019 : बीडमध्ये पंकजा विरुद्ध धनंजय असाच सामना

Lok Sabha Election 2019 : बीडमध्ये पंकजा विरुद्ध धनंजय असाच सामना

Next

- सतीश जोशी 

बीड : लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, बहुजन वंचित आघाडीचे प्रा.विष्णू जाधव यांच्यासह ३६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, नोंदणीकृत पक्षाचे आठ आणि २६ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे हे जरी रिंगणात असले तरी  आरोप प्रत्यारोपाच्या फैरी मात्र उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे, त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे विरुद्ध विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यातच झडत आहेत. आतापर्यंत या बहीण भावात अधूनमधून आरोप-प्रत्यारोप होत होते परंतु, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ही तीव्रता वाढली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसांपासून या बहीण-भावांनी वातावरण तापविण्यास सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ धनंजय मुंडे यांनी आपल्या भगिनीच्या विरुद्ध रान उठविण्यास सुरुवात केली, तरी त्यांच्या सुरात सूर मिसळणारा इतर नेतेमंडळीचा आवाज तेवढा खुललेला दिसत नाहीत. उमेदवारी न मिळाल्याने माजी आ. अमरसिंह पंडित आणि त्यांचे बंधू माजी जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांचे समर्थक कमालीचे नाराज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे स्थानिक आमदार तथा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे बंधू नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर अजूनही गप्पच आहेत. उमेदवारी अर्ज भरतानादेखील ते अनुपस्थित होते. क्षीरसागर बंधूंची भाजपशी वाढणारी जवळीक सोनवणे यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. केजमध्ये नंदकिशोर मुंदडा यांच्याशी सोनवणे यांनी जूळवून घेतले आहे. एकीकडे तगडे नेटवर्क असलेला डॉ. प्रीतम मुंडेंसारखा उमेदवार आणि दुसरीकडे पक्षांतर्गत गटबाजी, असा दुहेरी सामना बजरंग सोनवणे यांना करावा लागत आहे.

इकडे भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांनी वर्षभरापासूनच मतदार संघात संपर्क वाढविला आहे. सहापैकी पाच विधानसभा भाजपच्या ताब्यात आहेत. राष्ट्रवादीचा एकमेव आमदार क्षीरसागरही सहकार्याच्या भूमिकेत आहे. राष्ट्रवादीतून निलंबित झालेल्या माजी मंत्री सुरेश धसांना विधान परिषदेवर निवडून आणून भाजपची ताकद वाढविली. आ. विनायक मेटेंचा विरोध असला तरी तीन जि. प. सदस्य फोडून त्यांची शिवसंग्राम खिळखिळी करून टाकली आहे. बहुजन विकास आघाडीकडून  प्रा. विष्णू जाधव हे ही रिंगणात उतरले आहेत.

प्रमुख उमेदवार :
डॉ. प्रीतम मुंडे । भाजप
बजरंग सोनवणे। रा.काँ.
प्रा. विष्णू जाधव । वंचित बहुजन आघाडी 

कळीचे मुद्दे
अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्ग हा भाजपसाठी कळीचा मुद्दा होऊ शकतो. लोकसभा २०१९ हा मार्ग पूर्ण होण्याचे आश्वासन दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही स्थानिक प्रमुख नेत्यांची बीड जिल्हा सहकारी बँकेची कर्ज थकबाकी प्रकरणे प्रचारात निघू शकतात.

विकासासाठी प्रयत्न 
परळी-बीड-अहमदनगर रेल्वेमार्गाची नगरकडून बीडच्या वेशीपर्यंत यशस्वी चाचणी झाली आहे. ऊर्वरित कामही युद्धपातळीवर चालू आहे. उसतोड कामगारांच्या मुलांसाठी निवासी वसतिगृहाची कायमस्वरूपी सुविधा करण्याचा मानस आहे. खेळाडूंच्या विकासासाठी उपाययोजना करणार.
    - डॉ. प्रीतम मुंडे, भाजप 

शासन विरोधी नाराजीचा फायदा 
माझ्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ३० वर्षांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीने झाली आहे. त्यानंतर अनेकवेळा जिल्हा परिषद निवडणूक लढविली. स्थानिक पातळीवर काम केल्यामुळे लोकांच्या प्रश्नांची जाण आहे. या निमित्ताने जनतेचे प्रश्न देशपातळीवर मांडण्याची संधी मिळेल. शासनाच्या विरोधातील नाराजीचा मला फायदा मिळेल.
- बजरंग सोनवणे, रा.काँ.

Web Title: Lok Sabha Election 2019 : Its Pankaja Munde vs Dhananjay Munde in Beed Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.