Lok Sabha Election 2019 : क्षीरसागर बंधूंचे दोन डगरींवर हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 02:36 PM2019-04-08T14:36:01+5:302019-04-08T14:47:12+5:30
क्षीरसागर बंधू हे इतके मुत्सद्दी आहेत की पोटातले पाणीही हलू देत नाहीत, ओठावर येणे दूरच.
- सतीश जोशी
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘तळ्यात मळ्यात’ खेळणारे राष्ट्रवादी काँगेसचे आ. जयदत्त क्षीरसागर आणि बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर बंधू अजूनही राजकीय डावपेचात दोन डगरींवर हात ठेवून आहेत. बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडेंना पाठिंबा देत विजयाची गुढी उभारा, असे समर्थकांना सांगणारे क्षीरसागर बंधू पाडव्याला मुंबईत मातोश्रीवर दिसले. लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते. कारण युतीमध्ये बीडची जागा शिवसेनेला सुटली आहे.
क्षीरसागर बंधू हे इतके मुत्सद्दी आहेत की पोटातले पाणीही हलू देत नाहीत, ओठावर येणे दूरच. तीन वर्षे बारामतीच्या पवार काका-पुतण्यांना झुलवत ठेवत ऐन लोकसभेच्या रणधुमाळीत त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. मातोश्री माजी खा. केशरकाकूंपासून क्षीरसागर बंधूंपर्यंत आणि गोपीनाथराव मुंडेंपासून ते पंकजा, प्रीतम भगिनीपर्यंत या दोन घराण्यातील सलोख्याचे राजकीय संबंध साऱ्या जिल्ह्याला ठाऊक आहेत. निवडणुकीच्या काळात तर ते आणखी उफाळून येतात. प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वाट्याला जो संघर्ष, अपयश येत असे, त्याचे मूळ क्षीरसागर बंधूंचे मुंडे प्रेम असायचे. वाढती जवळीक पाहून ते भाजपत स्थिरावतील, असे वाटत असतानाच त्यांनी शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने पाडव्यालाच मातोश्री गाठले. क्षीरसागर बंधूंनी नेहमीच दूरवरचे राजकारण केले. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुका लागतील. युतीमध्ये बीडची जागा शिवसेनेला सुटली आहे. बीडमधून यापूर्वी माजी मंत्री सुरेश नवले, प्रा. सुनिल धांडे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत युती तुटली आणि भाजप, शिवसेना वेगवेगळी लढली. बीडमध्ये शिवसंग्रामचे आ. विनायक मेटे यांना उमेदवारी दिली परंतु, त्यांना भाजपच्या तिकिटावर उतरविले. आ. क्षीरसागर यांच्याकडून आ. मेटे हे अल्पशा म्हणजे पाच हजार मतांनी पराभूत झाले. २०१९ विधानसभा निवडणुकीत कदाचित युती झाली नाही तर भाजपाकडून या जागेवर निश्चितच आ. मेटे यांचा दावा असेल आणि युती झाली तर भाजपाला शिवसेनेला जागा सोडावी लागेल. भविष्यातील ही अडचण क्षीरसागर बंधूंनी हेरून आतापासूनच मातोश्रीचा आशीर्वाद घेण्यास सुरुवात केली आहे. यदाकदाचित युतीचे सरकार आलेच तर मंत्रीपदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच होईल. आ. सुरेश धस देखील लालदिव्याच्या प्रयत्नात असतील. तेव्हा भाजपातील मित्रांनीच त्यांना शिवसेनेचा मार्ग कदाचित दाखविला असावा.
पाडव्याच्या शुभेच्छा
राष्ट्रवादी काँगेसचे आ. जयदत्त क्षीरसागर आणि बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर आणि नगरसेवक डॉ. योगेश क्षीरसागर यांनी पाडव्याच्या रात्री ११ वाजता मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, या प्रश्नावर भारतभूषण यांनी आम्ही केवळ पाडव्याच्या शभेच्छा देण्यासाठी गेलो होतो, असे उत्तर दिले.
पुतण्याचा मार्ग मोकळा
दोन्हीही काका हे युतीच्या मार्गावर असल्यामुळे इकडे पुतण्या संदीप क्षीरसागरांचा बीड विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन्हीही काका राष्ट्रवादीपासून दूर गेल्यामुळे पुतण्या संदीपच्या गोटात उत्साह संचारला असून राष्ट्रवादीच्या प्रचारार्थ मतदार संघ पिंजून काढत आहेत. इकडे भाजपलाही क्षीरसागरामुळे प्रचारासाठी बळ मिळाले असून मतदारसंघात क्षीरसागर बंधूंचे नेटवर्क कामी येणार आहे.