Lok Sabha Election 2019 : मुंडे भगिनींनी कुटूंबियांसह घेतले प्रभू वैद्यनाथ, गोपीनाथ गडाचे आशीर्वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 01:03 PM2019-03-25T13:03:35+5:302019-03-25T13:05:50+5:30
डॉ. प्रीतम मुंडे आज भरणार उमेदवारी अर्ज
बीड : बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा-शिवसेना-रिपाइं-रासप महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ.प्रितम मुंडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी बीडकडे रवाना झाल्या. परळीहून निघण्यापूर्वी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे, खा. प्रीतम मुंडे यांनी कुटुंबियांसह प्रभू वैद्यनाथाचे तसेच गोपीनाथ गडाचे दर्शन घेतले.
खा. डाॅ. प्रितमताई मुंडे आज दुपारी २ वा. आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी यशःश्री निवासस्थानी त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे यांनी त्यांचे औक्षण केले. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह त्यांनी प्रभू वैद्यनाथाचे व लोकनेते मुंडे साहेबांच्या समाधीचे गोपीनाथ गडावर जाऊन दर्शन घेतले. यावेळी प्रज्ञाताई मुंडे ,अमित पालवे , यशश्री मुंडे सह आ.आर.टी देशमुख व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
दुपारी बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालय येथे उमेदवारी अर्ज दाखल केल्या नंतर ना.पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीड शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.या भव्य रॅलीचा समारोप माने कॉम्प्लेक्सच्या समोर पारस मैदान येथील प्रचंड जाहीर सभेने होणार असून सभेसाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे , ना.पंकजा मुंडे मंत्री राम शिंदे , महादेव जानकर यांच्या सह जिल्ह्यातील सर्व आमदार व भाजपा शिवसेना व महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.