Lok Sabha Election 2019 : बीडमध्ये मुंडे विरुद्ध सोनवणे सरळ लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 06:25 PM2019-03-23T18:25:33+5:302019-03-23T18:29:35+5:30
भाजपतर्फे प्रीतम मुंडे यांची उमेदवारी केव्हाच निश्चित झाली होती, ती रविवारी जाहीर होऊन औपचारिकता पूर्ण केली.
- सतीश जोशी
बीड : बीड लोकसभा मतदारसंघात भाजपतर्फे विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बजरंग सोनवणे हे रिंगणात उतरले आहेत. भाजपतर्फे प्रीतम मुंडे यांची उमेदवारी केव्हाच निश्चित झाली होती, ती रविवारी जाहीर होऊन औपचारिकता पूर्ण केली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अनपेक्षितपणे पक्षाचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर झाली आणि संपूर्ण जिल्ह्याला आश्चर्याचा धक्का बसला. ऐनवेळी माजी आमदार अमरसिंह पंडित यांची उमेदवारी नाकारली.
गोपीनाथरावांच्या अपघाती मृत्यूमुळे मतदारसंघात निर्माण झालेल्या सहानुभूतीचा फायदा पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे यांना मिळाला होता. तशी सहानुभूतीची लाट सध्या नाही. मतदारसंघातील सहा विधानसभांपैकी पाच मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. शिवाय राष्ट्रवादीतून निलंबित झालेले माजी मंत्री सुरेश धस यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधानपरिषदेवर निवडून आणून भाजपने आपली ताकद आणखी वाढविली.
युतीतील घटक पक्ष शिवसंग्रामचे विनायक मेटे हे विधानसभा निवडणुकीत बीडमध्ये पराभूत झाल्यानंतरही भाजपने त्यांना विधानपरिषदेवर घेऊन मराठा मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु वर्चस्वाच्या लढाईत पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यातील वाद विकोपाला गेला. राज्यात साथ, परंतु बीड लोकसभा मतदारसंघात भाजपचे काम करणार नसल्याचे शिवसंग्रामने जाहीर केले होते. देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांनी याची गंभीर दखल घेत अशी ‘डबल भूमिका’ चालणार नसल्याचे बजावले.
अमरसिंह पंडित समर्थकांची नाराजी
बजरंग सोनवणे हे नवखे उमेदवार असून, त्यांचे राजकारण जिल्हा परिषदस्तरापर्यंत आहे. मुंदडा सोडले तर कुणाशीही त्यांचा टोकाचा वाद नाही, त्यांची हीच जमेची बाजू. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार जयदत्त क्षीरसागर हे निवडून आल्यापासून पक्षाच्या संपर्क क्षेत्राबाहेर असून, दिवसेंदिवस त्यांचा भाजपशी घरोबा वाढत आहे. केज विधानसभा मतदारसंघातील नंदकिशोर मुंदडा आणि चिरंजीव अक्षय मुंदडा यांच्याशी सोनवणे यांचे कधीही जमले नाही. क्षीरसागर आणि मुंदडा यांच्या नाराजीचा फटका सोनवणे यांना बसू शकतो. अमरसिंह पंडित यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांचे समर्थक कमालीचे नाराज आहेत.
विनायक मेटेंचा विरोध
पाच विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. बीडची जागा राष्ट्रावादीकडे असली तरी स्थानिक आमदार जयदत्त क्षीरसागर आणि बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर वेळ पडेल तेव्हा खुलेआम भाजपला मदत करीत आहेत. राष्ट्रवादीतून निलंबित केलेल्या माजी मंत्री सुरेश धस यांना भाजपमध्ये घेऊन विधान परिषदेवर निवडून आणले आहे. त्यामुळे धस यांची मदत निश्चितच होणार आहे. या मुंडे यांच्या जमेच्या बाजू असल्या तरी शिवसंग्रामचे आ.विनायक मेटे यांच्या नाराजीचा फटका भाजपला बसू शकतो.