Lok Sabha Election 2019 : विकासाचे मुद्दे नसल्यानेच माझ्या वजनाची चर्चा : धनंजय मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 02:08 PM2019-03-28T14:08:01+5:302019-03-28T14:11:29+5:30
बीडच्या सभेत धनंजय मुंडे यांच्या मॉर्निंग वॉक विषयी मंत्री मुंडे यांनी टिका-टिप्पणी केली होती.
अंबाजोगाई (बीड ) : माझे शारीरिक वजन कमी झाले असले तरी, राजकीय वजन वाढले आहे, म्हणुनच भाजपला त्याची धास्ती आहे. माझ्या वजनावर काय चर्चा करता हिंमत असेल तर बीडच्या विकासावर बोला असे आव्हान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना दिले आहे.
बीड लोकसभेचे राष्ट्रवादी -काँग्रेस आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ बुधवारी रात्री अंबाजोगाई तालुक्यात सायगाव येथील सभेत धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी ते म्हणाले, देशात पुन्हा मोदींचे सरकार आले तर, यापुढे निवडणुकाच होणार नाहीत. त्यामुळेच ही निवडणुक महत्वाची असून, यावेळी चुक केली तर येणारी पिढी आम्हाला कदापी माफ करणार नाही.
विकासाचे मुद्दे नाहीत
बीड लोकसभा मतदार संघात पाच वर्षात निष्क्रिय कारभार केल्यामुळे विकासाचे कोणतेच मुद्दे बोलण्यासारखे नसल्यामुळे आता आपल्या वजनावर भाषणे होऊ लागले आहेत, असा टोला मुंडे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना लगावला. काही दिवसांपूर्वी बीडच्या सभेत धनंजय मुंडे यांच्या मॉर्निंग वॉक विषयी मंत्री मुंडे यांनी टिका-टिप्पणी केली होती.