Lok Sabha Election 2019 : प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीवरील आक्षेप फेटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 07:30 PM2019-03-28T19:30:11+5:302019-03-28T19:31:34+5:30
दाखल केलेले ६ आक्षेप जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी फेटाळले.
बीड : भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर अपक्ष उमेदवार कालिदास आपेट यांनी दाखल केलेले ६ आक्षेप जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी फेटाळले.
आक्षेप काय?
1. प्रीतम गोपीनाथ मुंडे यांनी मुंबई दक्षिण वरळी आणि बीड या दोन लोकसभा मतदारसंघात नाव नोंदविलेले आहे. लोकप्रतिनिधी कायदा १९५१ प्रमाणे गंभीर गुन्हा आहे.
2.बीडचे माजी खा. कै. गोपीनाथराव मुंडे यांचे नाव स्वत:च्या नावापुढे वापरुन प्रीतम मुंडे या जाणीवपूर्वक जिल्ह्यातील मतदारांना भावनिक करुन राजकीय फायदा उचलत आहेत.
3.प्रीतम मुंडे या लोकभावनेशी खेळत असून विशिष्ट व्यक्तीच्या नावाचा फायदा घेऊन मतांमध्ये रुपांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
4. प्रीतम गोपीनाथराव मुंडे यांनी २०१४ मध्ये पोटनिवडणुकीत दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाच्या शपथपत्रामध्ये निवासी इमारतीच्या माहितीमध्ये नं. १२०२ , पूर्णा- वरळी, सागर सोसायटी, सर पोचखानवाला रोड, मुंबई येथील मालमत्तेची माहिती दडविण्यात आली.
5.प्रीतम मुंडे या बॅँकेच्या संचालक आहेत. वैद्यनाथ बॅँकेच्या संचालकांवर बोगस कर्जवाटप अपहारप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून न्यायालयाने अद्यापपर्यंत दोषमुक्त केलेले नाही. वैद्यनाथ बॅँकेशी संबंधित इतर प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. त्यासंदर्भातील माहिती जाणीवपूर्वक शपथपत्रात नमूद केलेली नसल्याने प्रीतम मुंडे यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर करावा.
6.प्रीतम मुंडे यांचा प्रीतम गौरव खाडे या नावाने काढलेला डीन नंबर ३१ आॅक्टोबर २०२२ पर्यंत रद्द केल्याची माहिती शपथपत्रात नाही.
स्पष्टीकरण : अर्जदाराने कधीही दोन मतदारसंघात मतदान केले नाही. अशी नावनोंदणी उमेदवाराने स्वत: केलेली नाही. कंपनी कायद्याबद्दलचा आक्षेप निराधार आहे. प्रीतम यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल अथवा प्रलंबित नाही. उमेदवाराच्या दोन नावांबद्दल (विवाहापूर्वीचे आणि नंतरचे) शपथपत्र जोडले आहे. वैद्यनाथ बॅँकेच्या संदर्भात कोठेही गुन्हा दाखल नसल्याचे सांगत मुंडे यांचे प्रतिनिधी संतोष हांगे यांनी बाजू मांडली.