Lok Sabha Election 2019 : मेटेंना एकाकी पाडण्यासाठी ‘शिवसंग्राम’ला भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 02:16 PM2019-03-25T14:16:49+5:302019-03-25T14:19:34+5:30
पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यातील संघर्ष टोकाला
- सतीश जोशी
बीड : लोकसभेच्या तोंडावर जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि शिवसंग्रामचे आ. विनायक मेटे यांच्यातील संघर्ष अगदी टोकाला गेला आहे. राज्यात भाजपाला साथ आणि बीड जिल्ह्यात ‘लाथ’, अशी भूमिका घेणाऱ्या मेटेंना शिवसंग्रामचेच दोन जि.प. सदस्य भाजपात घेऊन पंकजा मुंडे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
युतीतील घटक पक्षांसोबत शनिवारी रात्री मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आ. मेटे यांची चर्चा चालू असतानाच इकडे शिवसंग्रामचे जि.प. सदस्य अशोक लोढा आणि विजयकांत मुंडे यांना शिवसंग्राममधून फोडत भाजपामध्ये आणले. या दोघांचा भाजपा प्रवेश म्हणजे आ. मेटेंसाठी दुसरा मोठा हादरा होता. यापूर्वी मेटेंचे खंदे समर्थक युवा प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांना शिवसंग्राममधून फोडत मेटेंची ताकद कमी केली होती. मस्के यांच्या पत्नी जयश्री मस्के या बीड जि.प.च्या उपाध्यक्षा आहेत. बीड जि.प.मध्ये शिवसंग्रामचे चार सदस्य निवडून आले होते. त्यापैकी तीन जण पंकजा मुंडेंच्या गळाला लागले आहेत.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यापासून ते पंकजा मुंडेंपर्यंत विनायक मेटे यांचे मुंडेंशी दीर्घकाळ कधीच जमले नाही. बीड जि.प.ची सत्ता हस्तगत करण्यासाठी पंकजा यांनी मेटेंसोबत उपाध्यक्षपद देऊन तडजोड केली होती; परंतु पुढे फार काळ त्यांचे जमले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मेटे यांनी वाढविलेली जवळीक मुंडे भगिनींना खटकत होती. राष्ट्रवादीतून निलंबित केलेल्या सुरेश धसांना भाजपत घेऊन पंकजा यांनी विधान परिषदेवर निवडून आणले. जि.प. सत्ता हस्तगत करताना आ. सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे आ. जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपला मदत केली होती. धस, मुंडे आणि क्षीरसागर, असे नवीन राजकीय समीकरण तयार झाले आणि त्यांनी मेटेंना एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला.
बीड विधानसभा मतदारसंघात मेटे आणि क्षीरसागर हे प्रतिस्पर्धी. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मेटे जवळपास सहा हजार मतांनी पराभूत झाले असताना त्यांना विधान परिषदेवर घेऊन भाजपने पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला. मेटेंची ताकद वाढली, तर भविष्यात सर्वांनाच धोका आहे, असे गृहीत धरून त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला. यात आ. जयदत्त क्षीरसागर आणि बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर आघाडीवर होते.
दुहेरी भूमिकेबद्दल भाजपचा मेटेंना इशारा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसंग्रामच्या प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची बैठक मेटेंनी घेतली. राज्यात शिवसंग्रामची भाजपाला साथ; परंतु बीड जिल्ह्यात मात्र आम्ही भाजपाचे काम करणार नाही, अशी भूमिका घेत आ. मेटे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंडे भगिनींची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही मेटे यांच्या या निर्णयाबाबत कठोर भूमिका घेत असे चालणार नाही, असा इशारा दिला होता.