विनायक मेटेंच्या हाती पुनश्चः घड्याळ; कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 05:20 PM2019-04-11T17:20:00+5:302019-04-11T17:21:11+5:30
पालकमंत्री मुंडे यांनी जिल्ह्यात केलेली कोंडी फोडण्याचा प्रयत्न
बीड : पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या कोंडीने ‘राज्यात भाजपसोबत परंतु बीडमध्ये प्रचार करणार नाही’ अशी दुहेरी भूमिका घेणाऱ्या शिवसंग्रामच्या आमदार विनायक मेटेंनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा जाहीर केला. भाजप श्रेष्ठींनी शिवसंग्रामची भूमिका चालणार नाही असे स्पष्ट केल्यानंतर मेटे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात लोकसभेसाठी शिवसंग्रामचा पाठिंबा राष्ट्रवादी कॉंग्रेसला असेल असे त्यांनी जाहीर केले.
बीड लोकसभेची या वेळेसची निवडणूक अत्यंत रंगतदार होत आहे. मागील आठवड्यात क्षीरसागर बंधूंनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपच्या प्रीतम मुंडे यांना विजयी करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले. क्षीरसागर बंधू नंतर जिल्ह्यात असंतुष्ट असलेले शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष होते. पालकमंत्र्यांकडून जिल्ह्यात होत असलेल्या कोंडीमुळे मेटे यांनी समर्थकांच्या बैठकीत भाजपचा जिल्ह्यात प्रचार करणार नाही, परंतु राज्यात मात्र युतीचा घटक म्हणून भाजपसोबत असेल, असे जाहीर केले होते. त्यांची ही दुहेरी भूमिका भाजप श्रेष्ठींनाही आवडली नाही. कोणताही एकच निर्णय घ्या. राज्यात सोबत असाल तर बीड जिल्ह्यातही भाजपसोबत काम करावे लागेल, असे प्रदेशाध्यक्षांनी सांगितले होते.
या पार्श्वभूमीवर मेटे यांनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला. मेळाव्यात त्यांनी शिवसंग्रामचा पाठिंबा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना जाहीर केला. जिल्ह्यातील आगामी राजकारण पाहता मेटेंनी जिल्ह्यात त्यांची झालेली कोंडी फोडण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
मुंडे यांच्याकडून फारसे महत्व नाही
पंकजा मुंडे यांनीही मेटे यांच्या ‘असहकार्य’च्या भूमिकेला फारसे महत्त्व न देता शिवसंग्रामचेच दोन जि. प. सदस्य फोडून चोख उत्तर दिले होते. यानंतरही पत्रकारांशी संवाद साधताना आपण मेटेंशी या विषयावर बोलणार नाही, कारण त्यांनी हा निर्णय घेतला, असे सांगून विषय बंद केला. भाजपच्या शिस्तीत मेटेंचे हे वागणे बसत नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या संदर्भात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुंडेंकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही.