कमी दिवसांत जास्त दारू विकणाऱ्यांवर नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 12:32 AM2019-04-01T00:32:12+5:302019-04-01T00:32:38+5:30
मागील वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांपेक्षा जास्त मद्य विक्री झालेल्या अनुज्ञप्तयांची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सखोल तपासणी केली जात असून दैनंदिन मद्य विक्री, किरकोळ दुकानांच्या कामकाजाच्या वेळा आदी बाबींवर या विभागाने लक्ष केंद्रित केले आहे.
बीड : मागील वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांपेक्षा जास्त मद्य विक्री झालेल्या अनुज्ञप्तयांची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सखोल तपासणी केली जात असून दैनंदिन मद्य विक्री, किरकोळ दुकानांच्या कामकाजाच्या वेळा आदी बाबींवर या विभागाने लक्ष केंद्रित केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कडक मोहीम राबविण्यात येत आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून विभागाने ६९ गुन्हे नोंदविले असून एकूण ५२ आरोपींना महाराष्टÑ दारुबंदी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ८.८८ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ज्यात १०१ लिटर हातभट्टी दारु, २४ हजार ४२० लिटर हातभट्टी गाळण्यासाठी लागणारे रसायन, १९५ लिटर देशी दारु, ४१ लिटर बीअर, ३२ लिटर ताडी व ७७ लिटर परराज्यातील विदेशी मद्य जप्त केले आहेत.
दरम्यान, ३० मार्च रोजी राज्य उत्पादन शुल्क बीड विभागाचे निरीक्षक एम. ए. शेख, भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक घोरपडे, नैबळ, जवान मोरे, एस. के. सय्यद, सांगुळे व जवान सुंदर्डे यांच्या पथकाने बीड तालुक्यातील नवगण राजुरी शिवारातील गावंधरा ओढा व डोमरी नदीच्या परिसरातील हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून २०० लिटर मापाचे १६ लोखंडी ड्रम, ३५ लिटर मापाचे १० प्लास्टिक कॅन व ३ हजार ५५० लिटर गूळमिश्रित फसफसते उग्र वासाचे रसायन असा ९१ हजाराचा मुद्देमाल जागीच नष्ट केला. तसेच ज्या हातभट्टींच्या ठिकाणी धाड टाकली तेथे आरोपी मिळून न आल्याने विभागाकडून ६ बेवारस गुन्हे नोंद केले असून हातभट्टी चालकाचा शोध सुरु असल्याचे सांगण्यात आले.
आचारसंहितेच्या काळात जिल्ह्यातील सर्व किरकोळ मद्द विक्री परवानाधारकांकडून त्यांनी दिवसभरात केलेल्या मद्य विक्रीची माहिती मागविण्यात येत असून ही माहिती निवडणूक विभागाकडे सादर करण्यात येत आहे. मद्य विक्री अनुज्ञप्तीधारकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित अनुज्ञप्ती विरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एन. के. धार्मिक यांनी सांगितले.