बीडमध्ये ८७ छावणीचालकांभोवती कारवाईचा पाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:06 AM2018-02-27T00:06:39+5:302018-02-27T00:06:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात २०१३-१४ मध्ये टंचाई काळात चालविलेल्या चारा छावणी चालक संस्थांवर पुन्हा एकदा कारवाईचा फास ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात २०१३-१४ मध्ये टंचाई काळात चालविलेल्या चारा छावणी चालक संस्थांवर पुन्हा एकदा कारवाईचा फास आवळला आहे. उच्च न्यायालयात दाखल प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्या आदेशानुसार बीड जिल्ह्यातील ८७ छावणी चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ३ वर्षे शांततेत गेल्यानंतर या कारवाईमुळे छावणी चालविणाºया पुढारी आणि कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या छावणी चालकांकडून सुमारे ३ कोटी ५८ लाख ९४ हजार ३१० रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
२०१२ ते २०१५ या कालावधीत बीड जिल्ह्याला दुष्काळी झळा सहन कराव्या लागल्या. २०१३-१४ या आर्थिक वर्षात ज्या चारा छावण्यांनी छावणी व्यवस्थापन करताना निष्काळजीपणा केला अशा चारा छावणी संस्थांविरुद्ध अनियमितता केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे आणि त्याचबरोबर दंड वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.
बीड जिल्ह्यात पाटोदा, आष्टी, शिरुर तालुक्यात मोठ्या प्रमाणात छावण्यांना मंजुरी मिळाली होती. दरम्यान, न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सोमवारपासून चारा छावणी चालक व संस्थांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करुन दंड वसूल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तालुकापातळीवर संबंधित तहसीलदारांना गुन्हे दाखल करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे.
या कारणांसाठी होणार कारवाई
छावणी परिसरात बॅरिकेटिंग न करणे, जनावरांना बिल्ले न लावणे, पाण्याचा हौद न बांधणे यासह अनियमितता बाळगल्याप्रकरणी कारवाईचे निर्देश. एकूण रकमेवर दंड आकारुन दंडाची नव्याने परिगणना करण्याचे निर्देश छावणीच्या ठिकाणी हौद, बॅरिकेटींग न केल्याबद्दल दिलेल्या मूल्यांकनानुसार किंमत वसूल करणे तसेच बिल्ला न लावल्याने प्रती जनावर ४ रु. प्रमाणे वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बीड तालुक्यातील ११ संस्था
बीड तालुक्यातील पाली येथील तालुका दूध उत्पादक संघ, पालवण येथील यशवंत सेवाभावी संस्था, मांजरसुंबा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, राजुरी येथील गजानन सहकारी साखर कारखाना, स्वामी रामानंद तीर्थ युवामंच पालवण संस्थेच्या इमामपूर व खापर पांगरी तसेच वरवटी येथील धनराज संस्था, पाटोदा बेलखंडी येथील हनुमान महिला सहकारी संस्था, कामखेडा येथील शहबाज सेवाभावी संस्था.
आष्टीत ४५ छावण्या
आष्टी तालुका दूध उत्पादक व सहकारी संस्था, महेश सहकारी साखर कारखाना, महेश सेवाभावी संस्था, शिराळ, संत तुकाराम कृषी विकास संस्था, हिंगणी, औदुंबर सेवाभावी संस्था टाकळी, संत बाळूदेव सेवाभावी संस्था धानोरा, त्रिमूर्ती सेवाभावी संस्था, चिखली, इंदिरा महिला दूग्ध व्याव. सहकारी संस्था निमगाव बोडखा, गजानन दूग्ध सहकारी संस्था, अंबिका सेवाभावी संस्था, केरूळ, माऊली महिला मंडळ पिंप्री, प्रतिभाताई सेवाभावी संस्था शेरी, जोगेश्वरी सेवाभावी संस्था पारगाव, कपिला दूग्ध सहकारी संस्था, शिवशारदा महिला दूग्ध सहकारी संस्था, जयदत्त सेवाभावी संस्था, चिंचपूर, सूर्यभानबाबा संस्था कºहेवाडी, शिवकृपा दूग्ध संस्था डोंगरगण, लक्ष्मी दूग्ध संस्था भवरवाडी, राजमाता शिक्षण संस्था डोईठाण, शिवसागर महिला ग्रामीण बिगर संस्था, कडा, गुरुदत्त सेवाभावी संस्था, कडा, सम्राट दूग्ध संस्था, खडका, महासती महिला दूग्ध सहकारी संस्था हिंगणी, गणेश दूग्ध संस्था देवळाली यांच्यावर कारवाई होणार आहे. जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्या आदेशानुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी सांगितले.