शिरुर कासार तालुक्यातील तागडगावात भगवानबाबांचा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 12:58 AM2018-03-30T00:58:51+5:302018-03-30T00:58:51+5:30
शिरुर कासार तालुक्यातील तागडगाव येथे ऐश्वर्यसंपन्न संत भगवान बाबांनी प्रारंभ केलेल्या ८५ व्या नारळी सप्ताहाचा गुरूवारी मंहत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या हस्ते चैतन्यपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. प्रसंगी प्रथमच फूल टाकण्यासाठी खा. प्रीतम मुंडे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री सुरेश नवले, संदीप क्षीरसागर यांची उपस्थिती होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरुर कासार : तालुक्यातील तागडगाव येथे ऐश्वर्यसंपन्न संत भगवान बाबांनी प्रारंभ केलेल्या ८५ व्या नारळी सप्ताहाचा गुरूवारी मंहत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या हस्ते चैतन्यपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. प्रसंगी प्रथमच फूल टाकण्यासाठी खा. प्रीतम मुंडे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री सुरेश नवले, संदीप क्षीरसागर यांची उपस्थिती होती. मावशीच्या गावात संत भगवानबाबांच्या जयजयकाराने उथळा परिसर दुमदुमुन गेला होता.
प्रथम देव घरात कलश व प्रतिमापूजन सिध्देश्वर संस्थानचे महंत स्वामी विवेकानंद महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. नंतर व्यासपीठावरून मान्यवरांनी बाबांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. नामदेव शास्त्रींच्या आदेशाप्रमाणे सर्व कार्यक्रम होत होते. व्यासपीठावर सर्व मान्यवरांसह शास्त्रीजी उभेच होते. नंतर श्रीक्षेत्र भगवानगडाच्या परंपरेप्रमाणे मानाचे टाळकरी व महाराज मंडळी आणि गडावर अध्यापक असलेले नारायण स्वामी या सर्वांच्या हस्ते टाळ, वीणा, मृदंग, गाथा, ज्ञानेश्वरी पूजन करून हजारो भाविकांनी जयजयकार करत पुष्पवृष्टी केली.
तागडगावात हा नारळी सप्ताह होण्याची दुसरी वेळ असून यापूर्वी महंत भीमसिंह महाराज यांच्या हस्ते सन १९५६ मध्ये साजरा झाला होता. तागडगांव हे संत भगवानबाबांच्या मावशीचे गाव. याच गावात त्यांचे बालपण काही काळ गेले होते. त्याशिवाय पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचल्याचे सांगितले जात असल्याने या नारळी सप्ताहाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. ग्रामस्थ मोठ्या प्रेमाने बाबाच्या ऐश्वर्याला साजेसा असा सप्ताह साजरा करणार आहेत.
सात दिवस आता तागडगावात हा भव्य दिव्य सप्ताह पाहण्यासाठी व अध्यात्मिक आनंद घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन ग्रामस्थांनी चोख नियोजन केले आहे. नूतन महंत अतुल महाराज शास्त्री हे देखील लक्ष ठेवून आहेत.
सर्व राजकीय पुढाऱ्यांना एका रांगेत उभे करणारे एकच न्यायाचार्य असे सांगून ते सुध्दा उभेच राहिले, असे सांगत गडाप्रती असलेली भावना अगदी अल्प शब्दात माजी मंत्री सुरेश नवले यांनी व्यक्त केली. इतर मान्यवरांनीही यावेळी संत भगवान बाबा यांच्याप्रती मनोगत व्यक्त केले.
यावेळी तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरातून हजारो भाविक येथे उपस्थित होते.
नेता म्हणून नव्हे, तर भक्त म्हणून आले - प्रीतम मुंडे
राजकीय भाषण करणार नाही. मी येथे नेता म्हणून नव्हे, तर भक्त म्हणून आले. मी श्रध्देपोटी आले आहे. संत भगवानबाबांनी स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार केला होता. पशुहत्याही बंद केल्या. मुुलींचा, महिलांचा सन्मान हीच त्यांची शिकवण असल्याचे सांगून तुमच्या प्रेमाचा आम्हाला गर्व होऊ नये, असे मत खा. मुंडे यांनी व्यक्त केले. मात्र धनंजय मुंडे यांना भाऊ म्हणणे टाळले.
मी अध्यात्माचे नियम पाळणारा - धनंजय मुंडे
अध्यात्माचे नियम पाळणारा मी असून, हे व्यासपीठ आशीर्वाद घेण्याचे आहे. राजकारण येऊ देऊ नका. आपला जिल्हा अध्यात्मिक क्षेत्रात आघाडीवर आहे. अध्यात्म जपणे आपले काम आहे. मनाच्या मंदिरात बाबांना ठेवा असे सांगून आम्हा बहीण- भावाला या व्यासपीठावर बोलावले, असे म्हणत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बंधू धर्म निभावला.
बहीण - भाऊ अन् महंत एकाच मंचावर
दसरा मेळाव्यादरम्यान भगवानगडावर राजकीय भाष्य करण्यासंदर्भात विरोध झाला होता. त्यानंतर मुंडे बंधू-भगिनी व महंत नामदेव शास्त्री यांच्याबद्दल नागरिकांमध्ये चर्चा होत होती. गुरुवारी नारळी सप्ताहाच्या निमित्ताने खा. डॉ. प्रीतम मुंडे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे तसेच भगवानगडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री हे एकाच व्यासपीठावर होते. कार्यक्रमात ते एकत्रित आल्याने दिवसभर चर्चेचा विषय होता.