नोकऱ्या गेल्यामुळे मानसिक तणाव वाढला, कुटुंबाला जगवायचे कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:33 AM2021-05-13T04:33:35+5:302021-05-13T04:33:35+5:30
बीड : संपूर्ण देशात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. यासंदर्भातील वृत्ताने जनमानसावर गंभीर परिणाम होत आहे. आरोग्य यंत्रणा तोकडी पडत ...
बीड : संपूर्ण देशात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. यासंदर्भातील वृत्ताने जनमानसावर गंभीर परिणाम होत आहे. आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहे, दररोज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. रुग्णांना उपचार करण्यासाठी अनेक ठिकाणी बेड उपलब्ध होत नाही. ऑक्सिजन मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. लस उपलब्ध नाही. असे एक ना अनेक प्रश्न सद्य:स्थितीत समोर आहेत. यात अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे मानसिक तणावाखाली असलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊनमुळे अनेकजण घरात बंदिस्त झाले आहेत. त्यांना बाहेर पडण्यासाठी मार्गच राहिला नाही.
मनोरंजनाची साधने गेली आहेत. खेळाची मैदाने बंद झाली आहेत. घरी बसून त्यांच्या डोक्यात विविध प्रकारचे विचार येत आहेत. अनेकांची मानसिक स्थिती देखील बिघडली आहे. त्यामुळे सर्वांनी कोरोनाचा मुकाबला करताना सर्वांगीण आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. ताण वाढण्याचे सर्वांत मोठे कारण म्हणजे आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्यातच दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्ण संख्येचा परिणाम बाजारपेठ व उद्योगधंद्यावर झाला आहे. त्यामुळे नोकरी नसलेल्यांची संख्या देखील वाढली आहे. एकीकडे आर्थिक अडचण व दुसरीकडे कोरोनाची भीती या दुहेरी संकटामुळे काही जणांच्या मानसिकतेत प्रचंड बदल झाला असून, त्यांना विविध प्रकारे समुपदेशनाची गरज भासत आहे.
तरुणांचे प्रश्न वेगळेच
जिल्ह्यात मोठे उद्योग बोटावर मोजण्याइतके आहेत. त्यामुळे बीडच्या तरुणांना नोकरीसाठी पुणे, मुंबई, औरंगाबाद यासह इतर शहरात जावे लागते. दरम्यान, लॉकडाऊन आणि कोरोना संसर्ग यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.
दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग तरुणांमध्ये जास्त प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. तर लसीचा तुटवडा असल्यामुळे ती घेण्यासाठी धावपळ सुरु आहे.
वर्क फ्रॉम होममुळे अनेक तरुण वैतागले असून, कंपन्या मर्यादीत कालावधीपेक्षा जास्त वेळ काम करून घेत आहेत. त्यामुळे देखील ताण वाढला असून, कुटुंबात असून ते सतत कामात असतात.
पुरुष सर्वाधिक ताणात
नोकरी गमावल्यामुळे कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा या चिंतेमुळे अनेक पुरुष मंडळी मोठ्या प्रमाणात तणावाखाली आहेत. तसेच विविध प्रश्न समोर उभा असल्यामुळे पुढील भविष्याची चिंता वाढली आहे.
कोण म्हणतो पुरुष व्यक्त होत नाहीत?
लॉकडाऊनमुळे पुरुष मंडळी घरीच बसून आहेत. रोजगार नाही, काहींच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये कुटुंबामध्ये कलह देखील वाढला आहे. अनेकवेळा व्यक्त न होणारे पुरुष या काळात वाढत्या ताणामुळे व्यक्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच महिलांच्या देखील समस्या याच पद्धतीच्या असून, या काळात कुटुंबात सुसंवाद असणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
नोकरी गेली आता काय पर्याय?
लॉकडाऊनमुळे मागील वर्षापासून अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. दरम्यान, नोकरी गेल्यामुळे अनेकांनी पर्यायी मार्ग स्वीकारला आहे. काही जणांनी गृहउद्योग सुरु केले आहेत. तर, काहींनी गावी शेतात राबण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र जे भुतकाळाचा विचार करत बसले ते मात्र प्रचंड तणावाखाली वावरत आहेत. यातून अनुचित प्रकार घडल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत.