यंदा भरपूर पाऊस; पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:41 AM2021-06-09T04:41:14+5:302021-06-09T04:41:14+5:30
बीड : जिल्ह्यातून गोदावरी नदी अनेक गावांतून वाहते. जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग प्रमाणापेक्षा जास्त करण्यात आल्यानंतर जवळपास ६३ गावे ...
बीड : जिल्ह्यातून गोदावरी नदी अनेक गावांतून वाहते. जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग प्रमाणापेक्षा जास्त करण्यात आल्यानंतर जवळपास ६३ गावे पुराच्या विळख्यात अडकतात. यावर्षी भरपूर पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला गेला आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
बीड जिल्ह्यात गोदावरी, सिंदफना, बिंदुसरा, वाण, मांजरा, सिना या प्रमुख नद्या आहेत. मात्र, सर्वाधिक पुराचा धोका हा दरवर्षी गोदावरी नदीकाठच्या गावांना असतो. त्यामुळे पूर आल्यानंतर नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येते. या कामासाठी प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिका, महसूल व पोलीस प्रशासनातील मिळून ३६ अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलेले असते. पुराचा संभाव्य धोका ओळखून स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी नागरिकांना नोटीस दिली जाते. अनेक शहरात धोकादायक इमारती आहेत. त्यांच्यावर देखील कारवाई केली जाते. पूर परिस्थितीमधून नागरिकांच्या जीवितांचे रक्षण करण्यासाठी अग्निशमन दलातील जवान देखील सज्ज असतात.
दरम्यान, जिल्ह्यातील काही उपनद्यांना देखील मोठा पाऊस झाल्यानंतर पूर येतो. त्यामुळे गावखेड्यातील नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार भरपूर पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन निवारण कक्षाकडून या परिस्थितीचा सामना करण्याची तयारी करण्यात आली आहे.
...
जिल्ह्यातील प्रमुख नद्या ६
नदीशेजारील गावे ८७
पूरबाधित होणारे तालुके ४
जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान
६७० मि.मी.
...
प्रशासनाची काय तयारी?
फायर फायटर ६
रेस्क्यू व्हॅन ३
फायर बोटी २
कटर ४
लाईफ जॅकेट्स ३०
....
पूरबाधित क्षेत्र
जिल्ह्यातील पूरबाधित क्षेत्रामध्ये तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना आहेत. नैसर्गिक आपत्ती विभागाने अशा भागांचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे. त्यानंतरही पुनर्वसनासाठी पुरेशी जागा उपलब्ध करण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, संभाव्य पुराचा धोका ओळखून अन्य उपाययोजना करणे देखील गरजेचे आहे.
...
अग्निशमन दल सज्ज
पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन यंत्रणेचीही युद्धपातळीवर मदत घेतली जाते. जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये बाजार समिती व नगरपालिका मिळून अग्निशमन दलाचे कर्मचारी, अधिकारी आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांची मदत पूरपरिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासनास होते. त्यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवण्यात आलेली असते.
....
शहरांमधील जुन्या इमारती धोकादायक
जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये जुन्या इमारतींचे सर्वेक्षण नगरपालिका व पंचायतीच्यावतीने केले जाते. मात्र, इमारती धोकादायक असताना देखील त्यावर कारवाई करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे शहरातील जुन्या व कालमर्यादा संपलेल्या इमारती कायम धोकादायक आहेत. त्यामुळे योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील गोदावरीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा वेळोवेळी स्थानिक प्रशासनाकडून दिला जातो. तसेच पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून तयारी करण्यात आली आहे.
- मच्छिंद्र सुकटे, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड.