'लव्ह लेटर' गेले थेट प्रेयसीच्या आईच्या हातात; आणि ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 07:39 PM2019-08-08T19:39:43+5:302019-08-08T19:41:50+5:30
एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीच्या भावाकडे तरुणाने दिले पत्र
अंबाजोगाई (बीड ) : ‘मला तू आवडतेस, तुलाही मी आवडत असेल तर सांग’ अशा मजकुराची चिट्ठी लिहून एकतर्फी प्रेमवीराने त्या अल्पवयीन विद्यार्थिनीस देण्यासाठी तिच्या लहान भावाजवळ दिली. भावाने ती चिट्ठी थेट आईच्या हातात दिली. त्यामुळे संतापलेल्या आईने पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. सदर तक्रारीवरून त्या प्रेमवीरावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील साकुड येथे घडली.
कुलदीप उर्फ बबल्या अशोक रोडे (रा. साकुड, ता. अंबाजोगाई) असे त्या आरोपी तरुणाचे नाव आहे. कुलदीप मागील काही दिवसापासून गावातील एका १५ वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा पाठलाग करत होता. ती विद्यार्थिनी शाळेत जात असताना अनेकदा कुलदिप तिला रस्त्यात अडवून तू मला आवडतेस असे म्हणत असे. मंगळवारी पिडीत अल्पवयीन विद्यार्थिनी बँकेत खाते काढण्यासाठी आईसोबत अंबाजोगाईला आली होती. यावेळी घरात तिचा आठ वर्षीय लहान भाऊ होता. कुलदिपने तिच्या लहान भावाला स्वतःच्या घरी बोलावून घेतले आणि तुझी दिदी कुठे आहे अशी चौकशी केली. त्यानंतर एक चिट्ठी त्याने भावाच्या हातात ठेवली आणि कोणालाही न सांगता तुझ्या बहिणीला दे असे सांगितले.
परंतु, आई आणि बहिण घरी आल्यानंतर भावाने ती चिट्ठी थेट आईच्या हातात ठेवली आणि कुलदिपने दिल्याचे सांगितले. आईला वाचता येत नसल्याने तिने दिराला बोलावून घेत चिट्ठी वाचून दाखविण्यास सांगितले. दिराने चिट्ठीतील मजकूर सांगताच संतापलेल्या आईने मुलीला बोलावून घेतले आणि कुलदिप तुला काही म्हणतो का अशी विचारणा केली. तेंव्हा शाळेत जात असताना कुलदिप नेहमीच पाठलाग करत असतो आणि काही वेळेस त्याने रस्त्यात अडवून बोलण्याचा प्रयत्न केल्याचेही सांगितले असा घटनाक्रम पिडीतेच्या आईने अंबाजोगाई ग्रामीण पोलीसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी कुलदिपवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी लगोलग त्याला ताब्यात घेतले.